पंतप्रधान मोदी-आयबीएम सीईओ यांच्यात ‘वर्क फ्रॉम होम’वर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 10:27 PM2020-07-21T22:27:52+5:302020-07-21T22:27:58+5:30
भारतातील २00 शाळांत कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात ‘सीबीएसई’सोबत आयबीएमची महत्त्वाची भूमिका बजावली आहे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. कोविड-१९ साथीचा कंपनीच्या कार्य संस्कृतीवर झालेला परिणाम आणि ‘वर्क फ्रॉम होम’ तंत्रज्ञान हा दोघांतील चर्चेचा मुख्य विषय होता, असे सूत्रांनी सांगितले.
मोदी यांनी यावेळी म्हटले की, आपले सरकार ‘वर्क फ्रॉम होम’ तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देत आहे. तंत्रज्ञानातील संक्रमण सुलभतेने व्हायला हवे. ‘आयबीएम’ने आपल्या ७० टक्के कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यानिमित्ताने ‘वर्क फ्रॉम होम’शी संबंधित तंत्रज्ञान आणि त्यातील आव्हाने मोदी यांनी यावेळी समजून घेतली.
भारतातील २00 शाळांत कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात ‘सीबीएसई’सोबत आयबीएमची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याबाबत मोदींनी कंपनीचे कौतुक केले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यांसारख्या विषयांची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मोदी यांनी सांगितले.