पंतप्रधानांची बातच न्यारी; स्कॉटलंडमध्ये वाजवले ढोल, नरेंद्र मोदींचे भारतीयांकडून जंगी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 12:06 PM2021-11-03T12:06:27+5:302021-11-03T12:15:41+5:30

स्कॉटलंडमध्ये पीएम मोदींनी तेथील भारतीय समुदायाच्या लोकांची भेट घेतली. भारतीयांकडून मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले.

Prime Minister Narendra Modi interacts with members of the Indian community and plays drums in scotland | पंतप्रधानांची बातच न्यारी; स्कॉटलंडमध्ये वाजवले ढोल, नरेंद्र मोदींचे भारतीयांकडून जंगी स्वागत

पंतप्रधानांची बातच न्यारी; स्कॉटलंडमध्ये वाजवले ढोल, नरेंद्र मोदींचे भारतीयांकडून जंगी स्वागत

Next

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) आज G-20 परिषद आणि कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीज(COP) 26  मध्ये सहभागी होऊन देशात परतले आहेत. पण भारतात परतण्याच्या काही तास आधी स्कॉटलंडमध्ये पीएम मोदींचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. भारताला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी तेथील भारतीय समुदायाच्या लोकांची भेट घेतली. भारतीयांकडून मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच, यावेळी नरेंद्र मोदींनी स्वागत समारंभात बँड वाजवणाऱ्या ग्रुपसोबत ढोल वाजवला.

मंगळवारी पंतप्रधान मोदी विमानतळावर जाण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडले. येथे त्यांच्या स्वागतासाठी अनेक लोक हॉटेलबाहेर उभे होते. त्यात काही ढोल-ताशे घेऊन उभे होते. पीएम मोदींना पाहताच त्यांनी ढोल वाजवायला सुरुवात केली. यादरम्यान पीएम मोदीही त्यांच्या जवळ पोहोचले, त्यांचे अभिवादन स्वीकारले आणि त्यांच्यासोबत ढोल वाजवला.

लोकांनी भारतीय पोशाखात स्वागत केले

हॉटेलबाहेर उपस्थित लोक पारंपारिक भारतीय पोशाखात उभे होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी तेथे उपस्थित लहान मुलांचीही भेट घेतली. आपल्या 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी ब्रिटन, इस्रायल, नेपाळ, इटली आणि फ्रान्ससह अनेक देशांच्या नेत्यांची भेट घेतली. याशिवाय रोममध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेतही पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते.

इस्रो लवकरच जगाला नवं उपकरण देणार
मंगळवारी स्कॉटलंडमध्ये पंतप्रधान मोदींनी सौर उर्जेची व्यवहार्यता वाढवण्यावर भर दिला आणि प्रत्येक गोष्ट सूर्यापासून उद्भवते यावर जोर दिला. त्यासाठी 'वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड'ची हाकही त्यांनी दिली. भारताची अंतराळ संस्था इस्रो(इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) लवकरच जगाला एक कॅल्क्युलेटर प्रदान करेल, जे जगभरातील कोणत्याही प्रदेशात सौर ऊर्जेची उपलब्धता मोजू शकेल, अशी घोषणाही पंतप्रधान मोदींनी केली.

औद्योगिक क्रांतीने पृथ्वी आणि पर्यावरणाचा नाश केला

क्लायमेट समिटच्या पार्श्‍वभूमीवर ग्लास्गो येथील जागतिक नेत्यांना संबोधित करताना 'क्लीन टेक्नॉलॉजी इनोव्हेशनचा प्रचार आणि उपयोजन' कार्यक्रमात मोदी म्हणाले की, औद्योगिक क्रांतीदरम्यान जीवाश्म इंधनाचा वापर करून अनेक देश श्रीमंत झाले, परंतु त्याचा पृथ्वीवर आणि पर्यावरणावरही परिणाम झाला. जीवाश्म इंधन वापरून औद्योगिक क्रांती झाली. जीवाश्म इंधन वापरून अनेक देश समृद्ध झाले आहेत, परंतु यामुळे पृथ्वी आणि पर्यावरणाचा नाश झाला आहे. जीवाश्म इंधनाच्या शर्यतीने भू-राजकीय तणावही निर्माण केला. 

पृथ्वी सुर्यावर अवलंबुन
आपल्या भाषणादरम्यान मोदींनी सूर्योपनिषदचा उल्लेख केला आणि प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती सूर्यापासून झाल्याचे सांगितले. सूर्य हा एकमेव ऊर्जेचा स्त्रोत असून सौरऊर्जा सर्वांना टिकवून ठेवू शकते, असे ते म्हणाले. तसेच, पृथ्वीवर जेव्हापासून जीवसृष्टी आहे, तेव्हापासून सर्व सजीवांचे जीवनचक्र, दैनंदिन दिनचर्या सूर्योदय आणि सूर्यास्ताशी निगडित आहे. निसर्गाशी हे नाते जोपर्यंत कायम राहील, तोपर्यंत पृथ्वी सुरक्षित राहील आणि निरोगी राहील, असेही मोदी म्हणाले.


 

Web Title: Prime Minister Narendra Modi interacts with members of the Indian community and plays drums in scotland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.