उत्तर प्रदेशमधील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोहम्मद शमीचा विशेष उल्लेख, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 01:11 PM2024-04-19T13:11:03+5:302024-04-19T13:11:40+5:30
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशभरात आघाडीवर राहून भाजपाचा प्रचार करत आहेत. शुक्रवारी मोदींनी उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथे प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी मोदींनी भारताचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami ) याचा खास उल्लेख केला.
लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात आघाडीवर राहून भाजपाचा प्रचार करत आहेत. शुक्रवारी मोदींनी उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथे प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी मोदींनी भारताचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शमी याचा खास उल्लेख केला. अमरोहा आता केवळ ढोल वाजवत नाही तर जगभरात देशाचा डंकाही वाजवतो. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये मोहम्मद शमी याने जी कमाल केली ती संपूर्ण जगाने पाहिली आहे. खेळांमधील चांगल्या कामगिरीसाठी त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता योगींचं सरकार येथे तरुणांसाठी स्टेडियमही बांधत आहे.
अमरोहा येथे प्रचारसभेसाठी आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. हा लोकशाहीमधील सर्वात मोठ्या उत्सवातील खूप मोठा दिवस आहे. घटनेद्वारे मिळालेल्या या अधिकाराचा सदुपयोग करा असं आवाहन मी करतो. विशेषकरून मी तरुणांना आवाहन करतो की, जे पहिल्यांदाच मतदान करत आहेत, त्यांनी ही संधी हातातून दवडू नये. अवश्य मतदान करावं, असे आवाहन मोदींनी केले.
मोदी पुढे म्हणाले की, अमरोहा आता केवळ ढोल वाजवत नाही. देशाचा डंकासुद्धा वाजवतो. यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये मोदम्मद शमीने जी कमाल केली आहे, ती संपू्र्ण जगाने पाहिली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, २०२४ ची लोकसभा निवडणूक ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. या निवडणुकीत तुमचं एक एक मत हे देशाचं भाग्य सुनिश्चित करणार आहे. भाजपा गाव आणि गरिबांसाठी एक मोठा दृष्टीकोन समोर ठेवून पुढे जात आहे. तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने सर्व ताकद ही गावांना मागास ठेवण्यामध्ये लागलेली आहे. याच मानसिकतेमुळे सर्वाधिक नुकसान हे अमरोहा आणि पश्चिम उत्तर प्रदेशसारख्या भागांचं झालं आहे.