पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात स्वीकारार्ह नेते, मॉर्निंग कंसल्ट सर्व्हेचा दावा
By बाळकृष्ण परब | Published: January 1, 2021 04:13 PM2021-01-01T16:13:21+5:302021-01-01T16:19:26+5:30
Narendra Modi News : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाचा डंका वाजवला आहे.
नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाचा डंका वाजवला आहे. जगभरातील नेत्यांच्या कार्यकाळातील स्वीकृतीवर नजर ठेवणाऱ्या डाटा फर्मच्या सर्वेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी ५५ टक्के स्वीकृती रेटिंगसह सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत. मॉर्निंग कन्सल्ट नावाच्या फर्मच्या नव्या सर्वेनुसार सुमारे ७५ टक्के लोकांनी मोदींना पाठिंबा दिला आहे. तर २० टक्के लोकांनी मोदींना विरोध केला. त्यामुळे मोदींची एकूण स्वीकृती रेटिंग ही ५५ टक्के राहिली.
याच प्रकाराचे जर्मनीच्या लोकप्रिय चांसलर एंजेला मार्केल यांची स्वीकृती रेटिंग २४ राहिली. तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची स्वीकृत रेटिंग नकारात्मक राहिली. याचा अर्थ त्यांना पाठिंबा देणाऱ्यांपेक्षा विरोध करणाऱ्यांची संख्या अधिक होती. भारतातील सर्वेदरम्यान घेण्यात आलेल्या सॅम्पलचा आकार दोन हजार १२६ एवढा राहिला आणि यामध्ये त्रृटीची शक्यता २.२ टक्के राहिली आहे.
२०२० मध्ये कोरोनाने समाज आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर आघात केला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाचे संधीत रूपांतर करण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन भाजपासाठी फायदेशीर ठरले. या संकटकाळात भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने चालवलेल्या अभियानांमुळे भाजपाने २०२० मध्ये नव्या क्षेत्रांमध्ये आपली उपस्थिती निर्माण केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतील राम मंदिराचे केलेले भूमिपूजन, तसेच विविध भाजपाशासित राज्यांमध्ये करण्यात येत असलेले लव्ह जिहाद विरोधी कायदे यामुळे भाजपाची हिंदू व्होट बँक मजबूत झाली आहे. मात्र सरलेल्या वर्षात शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे भाजपासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.