पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमध्ये
By admin | Published: August 3, 2014 12:00 PM2014-08-03T12:00:34+5:302014-08-03T12:26:26+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौ-यासाठी काठमांडू विमानतळावर पोहोचले असून नेपाळच्या पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत केले.
ऑनलाइन टीम
काठमांडू, दि. ३ - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौ-यासाठी नेपाळला रवाना झाले. रविवारी दुपारी काठमांडू विमानतळावर मोदींचे आगमन झाले असून नेपाळचे पंतप्रधान शिष्टाचार सोडून मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. रविवारी संध्याकाळी मोदी नेपाळच्या संसदेला संबोधित करणार आहेत. मैत्री दिनाच्या मुहुर्तावर मोदी नेपाळशी मैत्रीचे नवे नाते निर्माण करण्याचे प्रयत्न करतील ऐवढे मात्र नक्की.
नेपाळमध्ये तब्बल १७ वर्षांनी भारताचे पंतप्रधान दौ-यासाठी जात आहेत. यापूर्वी १९९७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल हे नेपाळ दौ-यावर गेले होते. २००२ मध्ये अटलबिहारी वाजपेयी हे नेपाळमध्ये सार्क परिषदेसाठी गेले होते. नेपाळ आणि भारताचे संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण असले तरी गेल्या काही वर्षांपासून या संबंधांमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला होता. याउलट चीनची नेपाळमधील रुची वाढत होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेपाळ दौरा हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. या दौ-यात मोदी नेपाळचे पंतप्रधान, विरोधी पक्षनेते व अन्य पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. सुरक्षा, उर्जा आणि पर्यटन या तीन विषयांवर मोदी नेपाळशी चर्चा करतील. मोदींसोबत १०० भारतीय अधिका-यांचा फौजफाटाही नेपाळमध्ये दाखल झाला आहेे.
रविवारी दुपारी नेपाळच्या काठमांडू विमानतळावर मोदींचे आगमन झाले. नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी मोदींची स्वागत केले. मोदींच्या दौ-यानिमित्त नेपाळमध्ये दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काठमांडूमध्ये सर्वत्र मोदींच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहे. सोमवारी मोदी पशुपतीथ मंदिरात विशेष पुजाही करणार आहेत.