मैत्रीचा आजपासून नवा अध्याय; पंतप्रधान नरेंद्र माेदी अमेरिका दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 06:11 AM2023-06-21T06:11:34+5:302023-06-21T06:12:52+5:30
पंतप्रधान मोदी मंगळवारी अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले. वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले.
नवी दिल्ली : सामायिक जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आम्ही एकत्रित ठामपणे उभे आहोत, असे सांगतानाच चीनसोबत सामान्य द्विपक्षीय संबंधांसाठी सीमावर्ती भागात शांतता आणि स्थिरता आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी मंगळवारी अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले. वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत कोणत्याही देशाची जागा घेत नाही. जगात आपले योग्य स्थान मिळवण्याचे लक्ष्य ठेवत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा भाग होण्याच्या भारताच्या इच्छेचे संकेत देताना पंतप्रधानांनी जगभरातील शांतता मोहिमांमध्ये सैन्याचे योगदान अधोरेखित केले.
अमेरिकेसोबत ड्रोन खरेदीचा होणार करार
- या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेसोबत एम क्यू ९ बी प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याचा करार करणार असल्याचे वृत्त आहे. या ड्रोनची लांबी ११ मीटर आणि पंखांची लांबी २० मीटर आहे. हे ड्रोन ३५ तास सतत उड्डाण करू शकते.
- हे ड्रोन ४४४ किमी प्रतितास वेगाने उडू शकते. ते ५० हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकते. तर, क्षेपणास्त्र आणि बॉम्बसह १७४६ किलो वजन घेऊन उड्डाण करू शकते. एकदा उड्डाण केल्यानंतर हे ड्रोन १८०० कि.मी.पर्यंतचा टप्पा सहज पार करु शकते. हे ड्रोन कंट्रोल रुममधून ऑपरेट करता येऊ शकते.
युक्रेन संघर्ष : आम्ही शांततेच्या बाजूने...
- युक्रेन संघर्षावर मोदी म्हणाले, काही लोक म्हणतात की आम्ही तटस्थ आहोत पण आम्ही तटस्थ नाहीत. आम्ही शांततेच्या बाजूने आहोत. सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा आणि देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे.
- वाद युद्धाने नव्हे तर मुत्सद्दीपणाने आणि संवादाने सोडवावा. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी आपण अनेकदा बोललो असल्याचे मोदींनी सांगितले.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी अमेरिका भेटीसाठी दिलेले हे विशेष निमंत्रण लोकशाहीमधील भागीदारीतील जोश आणि चैतन्य दर्शवते. सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे, नियम पाळणे आणि मतभेद आणि विवादांचे शांततापूर्ण निराकरण करणे यावर आमचा विश्वास आहे. आपले सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी भारत पूर्णपणे तयार आणि वचनबद्ध आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान