ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - दक्षिण आशियाई उपग्रहाचे (जीसॅट-9) इस्त्रोकडून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशांतील 6 देशांच्या प्रमुखांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ, मालदीव आणि श्रीलंका या देशांच्या प्रमुखांना उपग्रहाच्या प्रक्षेपणाबाबतची माहिती दिली.
दक्षिण आशियाई उपग्रहाच्या प्रक्षेपणाचा हा क्षण आपणा सर्वांसाठी ऐतिहासिक असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, भारताने दोन वर्षांपूर्वी दिलेले वचन आज (5 मे) पूर्ण केले आहे. हा उपक्रम म्हणजे दक्षिण आशियात आपापसातील सहकार्य वाढण्यासाठीची मोठी सुरुवात आहे. यामुळे दक्षिण आशियातील जनतेला फायदा होणार आहे. या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आपण एकत्र आले आहोत. पुढेही आपल्याला असेच चांगले प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रगत अंतराळ तंत्रज्ञानामुळे दक्षिण आशियातील लोकांना बरीच माहिती मिळणार आहे."
यावेळी त्यांनी असेही सांगितले की, "दक्षिण आशियाई दूरसंचार उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे प्रभावी संवाद व्यवस्था, उत्तम बँकिंग सेवा, हवामानाचा अंदाज इत्यादी महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकणार आहे. सबका साथ सबका विकास, हे आमचे लक्ष्य आहे.
तसंच मुख्य म्हणजे "सहकार्य" हे या उपग्रहाचे उद्देश आहे.
"नाश नाही विकास होणार, गरिबी नाही तर श्रीमंती वाढणार", असेही यावेळी मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, मोदींनी उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्त्रोच्या वैज्ञानिकांचंही अभिनंदन केले. यावेळी सहा देशांच्या प्रमुखांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त केले. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी म्हणाले की, "सहकार्यासाठी भारताने केलेले हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. गरीब आणि वंचितांसाठी काम करणं गरजेचं आहे. एकत्र राहून आपण विकास करू शकतो".
तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या की,"या उपक्रमामुळे आपले संबंध अधिक बळकट होतील. यामुळे लोकं एकमेकांशी जोडली जातील. जमीन, पाणी आणि अवकाशातही आपलं सहकार्य वाढेल".
"जीसॅट-9" या दक्षिण आशियाई दूरसंचार उपग्रहाचे उड्डाण भरले आहे. उपग्रह प्रक्षेपणात भारताचे हे पुढचं पाऊल आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो)या उपग्रहाचं प्रक्षेपण यशस्वीरित्या करण्यात आले. या भूस्थिर दूरसंचार उपग्रहाची बांधणी इस्रोने केली असून, येथून सुमारे 100 किलोमीटरवरील श्रीहरिकोटातील सतीश धवन अवकाश केंद्रावरून आज (शुक्रवारी) सायंकाळी 4 वाजून 57 मिनिटांनी आकाशात सोडण्यात आले.
सार्क देशांच्या आठपैकी भारतासह सात देश या प्रकल्पाचे सदस्य आहेत. पाकिस्तानने ‘आमचा स्वत:चा अवकाश कार्यक्रम’ असल्याचे सांगून या प्रकल्पातून अंग काढून घेतले आहे. त्यामुळे सार्कऐवजी "दक्षिण आशियाई उपग्रह" असे या उपग्रहाचे नामकरण करण्यात आले आहे.
उपग्रहाची आणि प्रक्षेपणाची वैशिष्ट्ये
उपग्रहाचे वजन २२३० किलो
उपग्रहाचा कार्यकाल १२ वर्षांपेक्षा जास्त
GSLV या प्रक्षेपकाद्वारे - रॉकेटेद्वारे उपग्रहाचे प्रक्षेपण
GSLV मध्ये स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन
स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनचा वापर केलेले GSLV चे सलग चौथे यशस्वी उड्डाण
आत्तापर्यंत GSLV प्रक्षेपकाची 10 पैकी 5 उड्डाण अयशस्वी ठरल्यानं GSLV ला नॉटी बॉय ( naughty boy ) म्हणूनही ओळख
Web Title: Prime Minister Narendra Modi says, "GSAT 9" will be available in two years of launch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.