पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार 'कर्तव्य पथ'चे उद्घाटन; नेताजींच्या पुतळ्याचेही अनावरण होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 09:30 AM2022-09-08T09:30:54+5:302022-09-08T09:34:18+5:30
Kartavya Path : जवळपास 3 किमी लांबीचा राजपथ आता नवीन स्वरूपात 'कर्तव्य पथ' (Kartavya Path) म्हणून ओळखला जाणार आहे.
नवी दिल्ली : आजपासून राजपथचे नाव बदलणार आहे. विजय चौक आणि इंडिया गेटला जोडणारा रस्ता, तो राजपथ आता इतिहासजमा होणार आहे. जवळपास 3 किमी लांबीचा राजपथ आता नवीन स्वरूपात 'कर्तव्य पथ' (Kartavya Path) म्हणून ओळखला जाणार आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आज संध्याकाळी 7 वाजता 'कर्तव्य पथ' चे उद्घाटन करणार आहेत.
दरम्यान, राजपथाचे केवळ नाव बदलत नाही तर राजपथाचे संपूर्ण रूपच बदलणार आहे. याचबरोबर, यावेळी पंतप्रधाननरेंद्र मोदी इंडिया गेट (India Gate) येथील नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा अरुण योगीराज यांनी तयार केला, जे मुख्य शिल्पकार आहेत. 28 फूट उंच पुतळा एका मोनोलिथिक ग्रॅनाइट दगडात कोरलेला आहे आणि त्याचे वजन 65 मेट्रिक टन आहे.
कसा आहे कर्तव्य पथ?
हा कर्तव्य पथ सुमारे तीन किलोमीटरचा आहे. त्यावर 4,087 झाडे आहेत. त्यावर 114 आधुनिक बोर्ड आहेत. 900 हून अधिक दिवे बसवले आहेत. 8 फीचर ब्लॉक्स तयार करण्यात आले आहेत. त्याचे क्षेत्रफळ 1,10,457 चौरस मीटर आहे. काँक्रीटचे 987 जाडीचे खांब आहेत. याशिवाय त्यात 1490 मॅनहोल करण्यात आले आहेत. 4 पादचारी अंडरपास करण्यात आले आहेत. लाल ग्रॅनाइटचे 422 बेंच आहेत.
नाव बदलण्यास मंजुरी
कर्तव्यपथावर 6 नवीन वाहनतळ बांधण्यात आले आहेत. 6 वेंडिंग झोन करण्यात आले आहेत. 1580 लाल-पांढऱ्या सँडस्टोनचे बोलार्ड बनवले आहेत. कचरा टाकण्यासाठी 150 डस्टबीन बसवण्यात आले असून या कर्तव्य पथावरील 19 एकर कालव्याचा पुनर्विकास करण्यात आला आहे. NDMC ने बुधवारी राजपथचे नामकरण कर्तव्य पथ असे करण्यास मंजुरी दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्तव्य पथ राष्ट्राला समर्पित करणार आहेत.