कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर जाणार; सुरक्षादल 'अलर्ट'!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 07:17 PM2024-03-04T19:17:59+5:302024-03-04T19:18:40+5:30
पंतप्रधानांच्या स्वागतासाठी काश्मीर खोरे सज्ज, संपूर्ण काश्मीरमध्ये चोख बंदोबस्त
Pm Modi on Kashmir Valley Tour: भारतासाठी 5 ऑगस्ट 2019 हा दिवस ऐतिहासिक होता. या दिवशी कलम 370 हटवण्यात आले. हे कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधाननरेंद्र मोदी काश्मीर खोऱ्यात दौऱ्यासाठी जाणार आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्यापूर्वी श्रीनगरमध्ये हाय अलर्ट आहे. याआधी मोदी यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये काश्मीर खोऱ्यातील परिसराला भेट दिली होती. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी काश्मीर खोरे सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७ मार्चच्या श्रीनगर दौऱ्याबाबत सुरक्षा दल चोख बंदोबस्त ठेवणार असून, संपूर्ण काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.
७ मार्च रोजी बक्षी स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी संपूर्ण काश्मीरमध्ये विशेषत: राजधानी श्रीनगरमध्ये व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण श्रीनगरमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे तर पोलीस, CRPF, SSG आणि इतर सुरक्षा एजन्सी रॅली सुरळीत पार पाडण्यासाठी तयार आहेत. बक्षी स्टेडियम सर्वसामान्यांसाठी खुले राहणार असले तरी शहरभर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. श्रीनगरच्या प्रत्येक चेक पोस्टवर तपासणी सुरु करण्यात आली आहे. तसेच मोबाईलचेही चेकिंग सुरु आहे.
ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रम स्थळावर ड्रोन व इतर आधुनिक साहित्यांच्या माध्यमातून हवाई निगराणी केली जाणार असून, आजूबाजूचा काही भाग ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असेल. PM मोदींनी अलीकडेच २० फेब्रुवारी रोजी जम्मूला भेट दिली होती आणि ३२ हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यामुळे यंदाच्या काश्मीर खोऱ्याच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी काश्मीरला काही उत्तम प्रकल्प देऊ शकतात असे बोलले जात आहे.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी काश्मीरमधील विविध संकल्पनात्मक प्रकल्पांचे उद्घाटन करतील आणि विविध केंद्रीय योजनांचा लाभ घेतलेल्या तरुण उद्योजक आणि कौशल्य कामगारांशी संवाद साधतील.