बालासोर अपघात: पंतप्रधान मोदींचे होते रात्रभर लक्ष; दर मिनिटाला घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 05:21 AM2023-06-04T05:21:13+5:302023-06-04T05:23:28+5:30
बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचाव कार्यावर रात्रभर बारकाईने लक्ष ठेवले.
संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी बचाव कार्यावर शुक्रवारी रात्रभर बारकाईने लक्ष ठेवले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना तातडीने घटनास्थळी रवाना केले. त्यांच्यासह ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडूनही ते प्रत्येक घडामोडींची माहिती घेत होते.
भारतातील मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक असलेल्या बालासोर अपघातानंतर पंतप्रधान मोदी यांनी बचाव कार्यात सहभागी सर्व मंत्रालयांची पंतप्रधान कार्यालयात तातडीने बैठक घेतली. संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य मंत्रालयातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना परिस्थितीवर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून संरक्षण मंत्रालय आणि एनडीआरएफला मदतकार्यात रात्रीच तातडीने सहभागी होण्याचे आदेश दिले. त्यामुळे शनिवारची सुटी असतानाही सर्व अधिकारी- कर्मचारी रात्रभर बचावकार्यात सहभागी झाले होते. या सर्व घडामोडींची प्रत्येक माहिती पंतप्रधान जाणून घेत होते. दरम्यान, पंतप्रधान मोदी सकाळ होताच बालासोरला जाणार होते; परंतु, त्यांच्या दौऱ्यामुळे बचाव कार्यात अडथळा येऊ शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्यांनी दुपारी घटनास्थळाचा दौरा केला.