आज देशभरात ४७ ठिकाणी रोजगार मेळावे; PM मोदी १ लाखाहून अधिक तरुणांना देणार नियुक्तीपत्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 08:49 AM2024-02-12T08:49:06+5:302024-02-12T08:52:31+5:30
Rozgar Mela : देशातील ४७ ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित केला जाणार आहे.
Rozgar Mela: नवी दिल्ली : देशभरात ४७ ठिकाणी रोजगार मेळावे होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेळाव्यात केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये नियुक्त केलेल्या १ लाखाहून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकात्मिक संकुल कर्मयोगी भवनाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी करतील. हे कॅम्पस मिशन कर्मयोगीच्या विविध स्तरांमधील सहकार्य आणि समन्वयाला प्रोत्साहन देईल.
अलीकडेच, पंतप्रधान कार्यालयाने (PMO) एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे १ लाखाहून अधिक नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करतील. देशातील ४७ ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित केला जाणार आहे. तसेच, या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारांना संबोधित देखील करणार आहेत.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, रोजगार मेळावा हे देशातील रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी एक पाऊल आहे. या मेळ्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणे आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि विकासात सहभागासाठी संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.
'या' विभागांमध्ये नियुक्ती
महसूल विभाग, गृह मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, अणुऊर्जा विभाग, संरक्षण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, आरोग्य मंत्रालय, कुटुंब कल्याण, आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय यासारख्या इतर अनेक मंत्रालये आणि विभागांमध्ये या नवीन भरती करण्यात आल्या आहेत.
८८० हून अधिक ई-लर्निंग कोर्स उपलब्ध
नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आयजीओटी कर्मयोगी पोर्टलवर 'कर्मयोगी प्रारंभ' या ऑनलाइन मॉड्यूलद्वारे स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधीही मिळत आहे. विविध सरकारी विभागांमध्ये सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी हा ऑनलाइन ओरिएंटेशन कोर्स आहे. पोर्टलवर कर्मयोगी प्रारंभमध्ये शिकण्यासाठी ८८० हून अधिक ई-लर्निंग कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.