पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार २० पेक्षा जास्त प्रचारसभा; भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 06:01 AM2024-08-27T06:01:09+5:302024-08-27T06:01:30+5:30
पंतप्रधान मोदी सभा घेणार आहेत, अशा मतदारसंघांबाबत, वेळेबाबत नियोजन सुरू आहे.
हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या निवडणुकीत अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. पंतप्रधान मोदी सभा घेणार आहेत, अशा मतदारसंघांबाबत, वेळेबाबत नियोजन सुरू आहे. ते काश्मिरात दोन आणि जम्मूमध्ये किमान आठ सभा घेण्याची शक्यता आहे. ९० सदस्यांच्या हरयाणामध्येही ते आठ ते दहा सभांना संबोधित करू शकतात.
जम्मू-काश्मिरातील ९० जागांपैकी जम्मूतील सर्व ४३ जागा भाजप लढणार आहे, तर काश्मिरातील २० ते २७ जागा लढणार आहे. मात्र, तेथील १० ते १२ जागा जिंकण्यासाठी भाजपचा जोर असेल. खोऱ्यातील उर्वरित जागांवर भाजप लहान पक्ष आणि अपक्षांना अप्रत्यक्ष पाठिंबा देऊ शकतो.
जम्मू-काश्मिरात ९० मतदारसंघ २०१४ च्या निवडणुकीत भाजपने जम्मूतील ३७ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. परिसीमनानंतर ही संख्या ४३ वर पोहोचली आहे, तर काश्मिरातील जागांची संख्या ४६ ऐवजी ४७ झाली आहे.
शाह, गडकरींसह ४० स्टार प्रचारक
- भाजपने या निवडणुकांसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे दिली आहे. नरेंद्र मोदी हे प्रचाराचे नेतृत्त्व करतील. त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनुराग ठाकूर यांच्यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आदी स्टार प्रचारक असतील.