पंतप्रधान मोदींचेही 'करून दाखवले' अभियान सुरु होणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 08:14 PM2018-08-23T20:14:24+5:302018-08-23T20:16:12+5:30
शेवटच्या 100 दिवसांत उदघाटनांचा धुमधडाका केला जाणार
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधाननरेंद्र मोदी हे चार वर्षांत कोणकोणती कामे 'करुन दाखवली' याची मोठी मोहिम उघडणार आहेत. पीएमओने पुढील तीन महिन्यांत पूर्णत्वास येणाऱ्या 25 प्रकल्पांची यादी बनविली असून शेवटच्या 100 दिवसांत उदघाटनांचा धुमधडाका केला जाणार आहे. या प्रकल्पांचा वापर मोदी सरकार प्रचारासाठी करणार आहेत.
मागील महिन्यात पीएमओने सर्व राज्यांना कोणते प्रकल्प पूर्ण झाले आहेत किंवा पुढील काही महिन्यांत पूर्ण होणार आहेत याची माहिती मागविली होती. पंतप्रधान कार्यालयाच्या मुख्य सचिवांनी 2014 नंतर सुरु झालेल्या व चार वर्षांत पूर्ण केलेल्या विकासकामांची माहिती मागविली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी या प्रकल्पांची यादी जाहीर करतील व सरकारने कामे केल्याचा प्रचार करतील.
केंद्र सरकारने 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये एक प्रकल्प राबविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ज्या मंत्रालयांमध्ये सर्वाधिक प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत, त्यामध्ये नितीन गडकरी यांच्या खात्याचा समावेश आहे. मोदी पुढील तीन महिन्यांत अर्ध्या डझनपेक्षा जास्त रस्ते बांधकाम प्रकल्पांचे उद्घाटन करु शकतात. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.
आयुषमान योजनेच्या प्रारंभासाठी जागेचा शोध
25 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आयुषमान योजनेची मोठ्या प्रमाणात सुरुवात करणार आहेत .मात्र, अद्याप त्यांना ही योजना सुरु करण्यासाठी साजेशी जागा सापडलेली नाही. पुढील काही महिन्यांत ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत त्यापैकी एका राज्यात या योजनेची सुरुवात केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. या नवडणुकांपूर्वी किमान 50 लाख कुटुंबांना या योजनेची कार्डे वाटण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.