पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 6 वाजता देशवासीयांशी संवाद साधणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 01:22 PM2020-10-20T13:22:10+5:302020-10-20T13:23:10+5:30
देशातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याने पंतप्रधान त्याबद्दल बोलतील की सण-उत्सवांचा काळ असल्याने नागरिकांना काही आवाहन करतील, असे अनेक प्रश्न देशवासीयांना पडले आहेत.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेद्र मोदींकडून देशवासीयांसाठी आज संध्याकाळी 6 वाजता एक संदेश देणार आहेत. देशवासीयांनी सायंकाळी 6 वाजता आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा देशातील नागरिकांची उत्कंठा वाढली असून पंतप्रधान नेमकं कशाबद्दल बोलतील, याची चर्चा रंगली आहे.
देशातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याने पंतप्रधान त्याबद्दल बोलतील की सण-उत्सवांचा काळ असल्याने नागरिकांना काही आवाहन करतील, असे अनेक प्रश्न देशवासीयांना पडले आहेत. मोदींच्या ट्विटनंतर पुन्हा एकदा नागरिकांकडून आपले अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. कारण, मोदी जेव्हा लाईव्ह येऊन काही सांगणार असे सांगतात, तेव्हा मोठा निर्णय जाहीर करतात. त्यामुळे, आज सायंकाळी 6 वाजता मोदी नेमकं काय सांगतील? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
आज शाम 6 बजे राष्ट्र के नाम संदेश दूंगा। आप जरूर जुड़ें।
— Narendra Modi (@narendramodi) October 20, 2020
Will be sharing a message with my fellow citizens at 6 PM this evening.
आयुष्यमान भारतच्या धर्तीवर ग्रामीण भारतातील आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधार करण्यासाठी केंद्र सरकारने 'आयुष्यमान सहकार' योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) ग्रामीण भारतातील आरोग्य सेवा (Healthcare) पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सहकारी संस्थांना १० हजार कोटी रुपयांचे कर्ज देईल. सोमवारीच या योजनेचा शुभारंभ झाला असून कदाचित या योजनेबद्दल मोदी माहिती देतील का, असेही काहींना वाटत आहे. मात्र, मोदी नेमकं काय सांगणार हे समजण्यासाठी संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या फेसबुक, ट्विटर अकाऊंटशी कनेक्ट रहावे लागणार आहे.