देशानं पक्षाला खूप काही दिलं; आता वेळ पक्षाची आहे - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 05:47 PM2017-09-25T17:47:56+5:302017-09-25T20:22:55+5:30
देशानं भाजपाला खूप काही दिलं; आता वेळ पक्षाची आहे. सर्वांनी हे लक्षात ठेवायला हवं असा सल्ला पंतप्रधानांनी आमदार आणि खासदारांना दिला.
नवी दिल्ली, दि. 25 - भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये सुरू असलेली बैठक समाप्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकारिणीत भाषण केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, देशानं भाजपाला खूप काही दिलं; आता वेळ पक्षाची आहे. सर्वांनी हे लक्षात ठेवायला हवं असा सल्ला त्यांनी आमदार आणि खासदारांना दिला. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीला देशभरातील 1400 आमदार आणि 337 खासदार व प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे.
यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांनाही टार्गेट केलं. ते म्हणाले, विरोधकांची टीका खालच्या पातळीची आहे. त्यांना चांगल्या कामाच्या माध्यमातून उत्तर द्या. तसेच अनावश्यक वक्तव्यांमुळे सरकारचं चांगलं काम मागे पडतं त्यामुळे अशा वक्तव्याकडे दुर्लश करा. असे आवाहन त्यांनी स्वपक्षिय नेत्यांना यावेळी केलं. जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करा अशी तंबीही मोदी यांनी पक्षातल्या वाचाळवीरांना दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या महिन्यात झालेल्या केरळमधील स्वयंसेवकाच्या हत्येचा देशभरात निषेध करा असेही ते म्हणाले.
या बैठकीत आर्थिक परिस्थिती व गुजरात, हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका यांवरही मंथन झाले आहे. गुजरात भाजपाच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. जे ठराव तिथे झालेत, त्यापैकी आर्थिक प्रस्तावात नोटाबंदी आणि जीएसटी अर्थव्यवस्थेसाठी कशाप्रकारे हिताचे आहे, ते सांगण्याचा प्रयत्न झाला आहे. महिला आरक्षण आणि रोहिंग्या शरणार्थी या मुद्द्यांवर चर्चा झालीय.
भ्रष्टाचारमुक्त भारताचा संकल्प - पीयूष गोयल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली असून, या बैठकीत भ्रष्टाचारमुक्त भारताचा संकल्प घेण्यात आला आहे. बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींसह पक्षाध्यक्ष अमित शाह व अरुण जेटलीही उपस्थित होते. तसेच गुजरात निवडणुकीत भाजपा ऐतिहासिक विजय संपादन करेल, असंही पीयूष गोयल म्हणाले आहेत.
बैठकीत भारताच्या नवनिर्माणासंबंधी विस्तृत चर्चा झाल्याची माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयवाद आणि सांप्रदायिक वातावरण बिघडवणा-या शक्तींपासून भारताचा मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. बैठकीत केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या राजकीय हिंसाचाराचाही निषेध नोंदवण्यात आला आहे. हिंसेनं भाजपाचा कोणताही कार्यकर्ता घाबरणार नाही, असंही पीयूष गोयल म्हणाले आहेत. भाजपा कार्यकर्ते शांती आणि लोकशाहीवर विश्वास ठेवतात. यावेळी राहुल गांधींवरही अमित शाहांच्या माध्यमातून पीयूष गोयल यांनी निशाणा साधला आहे. भारतीय राजकारण हे सुशासनावर विश्वास ठेवतं, असंही पीयूष गोयल म्हणाले आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. तर दुस-या एका भाजपाच्या बैठकीत कोर ग्रुपच्या नेत्यांसह भाजपाचे 1400 आमदार, 337 खासदार आणि नगरसेवक सहभागी झाले होते. तसेच 2000हून अधिक लोकही या बैठकीत सामील झाले होते.