पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागणार नाहीत, व्यंकय्या नायडू यांनी फेटाळली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:41 AM2017-12-21T00:41:30+5:302017-12-21T00:41:59+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून संसदेत सुरू असलेल्या गोंधळानंतरही माफी मागण्याची काँग्रेसची मागणी भाजपाने तसेच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावली.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून संसदेत सुरू असलेल्या गोंधळानंतरही माफी मागण्याची काँग्रेसची मागणी भाजपाने तसेच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावली.
राज्यसभेचे कामकाज याच मुद्यावर दुपारी दोनपर्यंत दोन वेळा तर लोकसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. मुख्य विरोधी पक्षाने सभात्यागही केला. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून माफी मागण्यावरून काँग्रेसने दोन्ही सभागृहांत गोंधळ सुरूच ठेवला आहे. बुधवारी काँग्रेसला दोन मोठे धक्के बसले. पहिला होता तो या मुद्यावर एकत्र आलेले विरोधक विस्कळीत झाले तेव्हा. मोदी यांनी माफी मागावी या काँग्रेसच्या मागणीला पाठिंबा द्यायला समाजवादी पक्षाने नकार दिला. दुसरीकडे सरकार काही बोलणार मोदी यांनी सभागृहात आरोप केले नसल्याने त्यांनी माफी मागावी, अशी सूचना करता येणार नाही, असे नायडू यांनी स्पष्ट केले.
सभागृहाचे कामकाज होऊ न देण्याच्या उद्देशाने काँग्रेससह इतर पक्ष आपल्या मागणीसाठी घोषणाबाजी करीत होते त्यावेळी नायडू यांनी स्वत:हूनच वरील निर्णय जाहीर केला. नायडू कडक व कठोर शब्दांत म्हणाले की ही काही पद्धत नाही. तिकडे लोकसभेत संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी काँग्रेसची माफी मागण्याची मागणी साफ फेटाळून लावली व काँग्रेसकडे काही मुद्दाच उरलेला नाही, ते सभागृहाला जबरदस्तीने विस्कळीत करीत आहेत, असा आरोप केला. राज्यसभेत विरोधी पक्षांचे नेते गुलाम नबी आझाद यांनी आम्ही मोदी यांच्याकडून खुलासा मागत आहोत, असे म्हटले. काँग्रेसची भूमिका मवाळ झाली याचे कारण असे की लोकसभेत मोदी उपस्थित होते. काँगे्रसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत पक्षाचे सदस्य सभागृहात गोंधळ घालत होते व मनमोहनसिंग यांची माफी मागावी, अशा घोषणा देत होते. परंतु समोर बसलेल्या मोदी यांच्यावर त्याचा काही परिणाम झालेला दिसत नव्हता.
आरोप मागे घ्या-
भाजपचा आक्रमक पवित्रा आणि विरोधकांच्या एकीत पडलेली फूट पाहून काँग्रेसने आपल्या माफी मागण्याच्या मागणीवर मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहे. सकाळपर्यंत माफी मागण्याच्या अटीवर अडलेला काँग्रेस पक्ष सायंकाळी आम्ही पंतप्रधानपदाचा सन्मान करतो परंतु मोदी यांनी सभागृहात स्पष्टीकरण द्यावे की त्यांनी गुजरातेत निवडणूक जिंकण्यासाठी आरोप केले होते व आता ते मी परत घेत आहे, असे म्हणण्यापर्यंत आला.