कोणाचीही अरेरावी, गैरवर्तन खपवून घेणार नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 05:45 AM2019-07-03T05:45:58+5:302019-07-03T05:50:02+5:30
कोणाचीही मनमानी सहन करणार नाही, असेही मोदी म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : कोणत्याही व्यक्तीची किंवा तिच्या पुत्राची अरेरावी, गैरवर्तन अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना दिला. भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र व इंदूरचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी एका महानगरपालिका अधिकाऱ्याला नुकतीच बॅटने मारहाण केली होती. त्याबद्दल आकाश यांचे नाव न घेता मोदींनी त्यांनाच हा इशारा दिला आहे.
कोणाचीही मनमानी सहन करणार नाही, असेही मोदी म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजप संसदीय पक्षाच्या या बैठकीला पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीयही हजर होते. मोदी म्हणाले की, अरेरावी व गैरवर्तनाच्या घटनांमुळे भाजपचे नाव खराब होते. एखाद्याकडून चूक घडली तर त्याने माफी मागण्याची तयारीही दर्शविली पाहिजे. आकाश विजयवर्गीय यांनी पालिका अधिकाºयाला मारहाण करताच त्यांना इंदूर पोलिसांनी अटक केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. आपण केलेली कृती योग्यच होती व त्याबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे वक्तव्य आकाश विजयवर्गीय यांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर केले होते. भाजपसंसदीय पक्षाच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर केले होते. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीबद्दल संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना सांगितले की, पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीदिनी ६ जुलैला भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेचा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे प्रारंभ होईल, तर अमित शहा तेलंगणामध्ये व अन्य राज्यांतील भाजप नेते आपापल्या भागात या मोहिमेला सुरुवात करतील.
पाच झाडे लावण्याचा ‘पंचवटी’ कार्यक्रम
भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथमध्ये किमान पाच झाडे लावावीत, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत दिला. या वृक्षलागवड कार्यक्रमाला त्यांनी पंचवटी असे नाव दिले.
चौदा वर्षांच्या वनवासाच्या काळात राम, सीता, लक्ष्मण हे काही काळ पंचवटीत राहिले होते. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात भाजपच्या सर्व खासदारांनी नियमित हजेरी लावली पाहिजे. त्यांनी जनकल्याणासाठी झटले पाहिजे. त्याकरिता ते ओळखले गेले पाहिजेत.
लोकसभेमध्ये तिहेरी तलाकविरोधी नवे विधेयक मांडण्यात आले त्यावेळी सभागृहात कमी संख्येने भाजप खासदार हजर होते. त्याविषयीही पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली.