पंतप्रधान नरेंद्र मोदी अनलॉकमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 07:49 AM2020-06-13T07:49:46+5:302020-06-13T07:50:00+5:30
कोरोना व्हायरसच्या महामारीचा उद्रेक झाल्यानंतर पंतप्रधानांची ही मुख्यमंत्र्यांशी चर्चेची सहावी फेरी असेल.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरस लॉकडाऊनमधून देश बाहेर पडत असताना आणि रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात देशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
मोदी हे १६ व १७ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांशी दोन टप्प्यांत संवाद साधणार आहेत. त्यात महाराष्टÑाच्या मुख्यमंत्र्यांशी १७ रोजी संवाद साधणार आहेत. कोरोना व्हायरसच्या महामारीचा उद्रेक झाल्यानंतर पंतप्रधानांची ही मुख्यमंत्र्यांशी चर्चेची सहावी फेरी असेल. यापूर्वी त्यांनी ११ मे रोजी संवाद साधला होता. लॉकडाऊन-४ संपण्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. मोदी हे १६ रोजी पंजाब, आसाम, केरळ, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगढ, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, चंडीगढ, गोवा, मणिपूर, नागालँड, लडाख, पुडुच्चेरी, अरुणाचल, मेघालय, मिझोराम, अंदमान-निकोबार बेटे, दादरा नगर हवेली व दमण दीव, सिक्कीम व लक्षद्वीप मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. मोदी १७ रोजी महाराष्टÑ, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीर, तेलंगणा व ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील.