पंतप्रधान नरेंद्र मोदी लिहिणार खास तरुण पिढीसाठी पुस्तक
By admin | Published: July 4, 2017 01:22 AM2017-07-04T01:22:36+5:302017-07-04T01:28:25+5:30
देशातील तरुण पिढीला डोळ्यापुढे ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक पुस्तक लिहिणार असून त्यात ते परीक्षेच्या वेळी येणारा ताण कसा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील तरुण पिढीला डोळ्यापुढे ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक पुस्तक लिहिणार असून त्यात ते परीक्षेच्या वेळी येणारा ताण कसा हाताळावा, प्रतिकूल परिस्थितीतही मानसिक संतुलन कसे राखावे आणि परीक्षेनंतरच्या भावी आयुष्याकडे डोळसपणे कसे पाहावे यासारख्या अनेक जिव्हाळ्याच्या विषयांवर देशाच्या भावी पिढीशी संवाद साधणार आहेत.
कोणाही पंतप्रधानांनी पदावर असताना असे पुस्तक लिहिण्याची ही पहिलीच वेळ असल्याने हा एकप्रकारे अभिनव उपक्रम आहे.
विद्यार्थ्यांना ज्यात रस वाटेल अशा अनेक विषयांवर मोदी या पुस्तकातून आपली मते मांडणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे टप्पे ठरणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षा हा या विचारमंथनाचा प्रमुख केंद्रबिंदू असेल.
पेंग्विन रॅण्डम हाऊस (पीआरएच) ही प्रतिथयश प्रकाशन संस्था मोदींचे हे पुस्तक प्रकाशित करणार आहे. एकाच वेळी अनेक भाषांमधील हे पुस्तक या वर्षीच्या उत्तरार्धात उपलब्ध होईल, असे प्रकाशकांचे म्हणणे आहे. नफा कमावणे हा उद्देश नसलेले ब्ल्यूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनचे या पुस्तकासाठी तांत्रिक व माहितीआधारित सहकार्य मिळणार आहे.
प्रकाशन संस्थेच्या म्हणण्यानुसार मोदी वडिलकीच्या नव्हे तर मित्रत्वाच्या नात्याने युवा पिढीशी संवाद साधणार असून परीक्षेत उत्तम यश मिळविणे गरजचे असले तरी ते सर्वस्व नाही. घोकंपट्टीने केवळ गुण मिळविण्याहून ज्ञानसंपन्न होणे अधिक महत्त्वाचे आहे, हे त्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करणार आहेत.प्रकाशकांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारचे पुस्तक काढण्याची कल्पना स्वत: मोदी यांचीच आहे. ‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ या कार्यक्रमाला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून पुस्तकाचा विचार त्यांच्या मनात आला. ‘मन की बात’मधील विषयांची बीजे घेऊन आणि त्याला काही अनुभवांची व रोचक किश्श्यांची जोड देऊन पंतप्रधान आपले विचार या पुस्तकाच्या रूपाने मांडणार आहेत.
युवा पिढीने घडविलेल्या व नेतृत्व हाती घेतलेल्या भावी काळाचे स्वप्न माझ्या मनात आहे. त्यामुळेच या पुस्तकातून मी त्यांच्याशी मला अत्यंत प्रिय अशा विषयांवर हितगूज करणार आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
देशाच्या तरुण पिढीला संदेश देणारे पंतप्रधान मोदी यांचे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आम्हाला खूप आनंद आहे. युवा पिढीच्या माध्यमातून देशात परिवर्तन घडवून आणण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न आहे व ते लोकांपर्यंत पोहोचविण्याचे भाग्य आम्हाला मिळत आहे, ही आमच्यासाठी खरंच आनंदाची बाब आहे.
- गौरव श्रीनागेश, सीईओ, पीआरएच