पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात जिंकले पण स्वत:च्या गावात हरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 03:17 PM2017-12-18T15:17:34+5:302017-12-18T15:41:49+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात जिंकले असले तरी ऊंझा विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपाचा पराभव झाला आहे.
वडनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात जिंकले असले तरी ऊंझा विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपाचा पराभव झाला आहे. ऊंझा विधानसभा मतदारसंघ भाजपासाठी महत्वाचा होता. कारण नरेंद्र मोदींचे जन्मगाव वडनगर ऊंझामध्ये येते. ऊंझामधून काँग्रेस उमेदवार आशा पटेल 20 हजार मताधिक्क्याने विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या नारायणभाई ल्लूदास पटेल यांचा पराभव केला.
ऊंझामधून 2012 मध्ये नारायण पटेल यांनी आशा पटेल यांच्यावर 25 हजार मतांनी विजय मिळवला होता. भाजपाला पाटीदारांच्या नाराजीचा फटका बसला. ऊंझामध्ये 40 टक्के पटेल मतदार आहेत. पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्याच्या आवाहनावरुन पटेल समाजाने काँग्रेसला साथ दिल्याचे निकालावरुन दिसत आहे.
दोनवर्षांपूर्वी पाटीदार आंदोलन झाले त्यावेळी ऊंझामध्ये झालेल्या आंदोलनात 14 युवकांचा मृत्यू झाला होता. ऊंझा मेहसाणा जिल्ह्यामध्ये येते. या जिल्ह्यात पाटीदार समाजाचे प्राबल्य आहे. वडनगर पंतप्रधान मोदींचे जन्मस्थान असून, मोदींचे बालपण याच शहरात गेले. गुजरात निवडणुकीच्याआधी मोदींनी वडनगरचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांचे जोरदार स्वागत झाले होते पण मोदींच्या घरातच भाजपाचा पराभव झाला आहे.