पंतप्रधान मोदींच्या 4 वर्षात 84 देशांना भेटी, 1484 कोटींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 10:38 AM2018-07-20T10:38:38+5:302018-07-20T10:40:19+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 पासून एकूण 84 देशांचा दौरा केला आहे. या 84 देशातील दौऱ्यासाठी मोदींवर आजपर्यंत तब्बल 1484 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 पासून एकूण 84 देशांचा दौरा केला आहे. या 84 देशातील दौऱ्यासाठी मोदींवर आजपर्यंत तब्बल 1484 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. चार्टर्ड विमान, विमानांची देखभाल आणि हॉटलाईन सुविधांसाठी हा खर्च करण्यात आला आहे. परराष्ट्र राज्यांचे राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी याबाबत राज्यसभेत माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 15 जून 2014 रोजी पहिला विदेश दौरा केला. त्यामुळे 15 जून 2014 ते 10 जून 2018 या कालवधीत मोदींच्या विदेश दौऱ्यावर 1484 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामध्ये विमानांच्या देखभालीसाठी 1088.42 कोटी, चार्टर्ड विमानांच्या उड्डाणांसाठी 387.26 कोटी रुपये तर हॉटलाईन सुविधेसाठी एकूण 9.12 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
नरेंद्र मोदींनी मे 2014 मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर आत्तापर्यंत मोदींनी 42 विदेश दौऱ्यांमध्ये 84 देशांना भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये 2014-15 मध्ये 13 देशांचा दौरा केला. तर भुटानपासून आपल्या पहिल्या विदेश दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर, 2015-16 मध्ये मोदींनी सर्वाधिक 24 देशांना भेट दिली. सन 2016-17 मध्ये मोदींनी 18 देशांचा दौरा केला तर 2017-18 मध्ये 19 देशांचा दौरा केला. यंदाच्या वर्षात जानेवारी ते जूनपर्यंत मोदींनी 10 देशांचा दौरा केला आहे.