घराणेशाहीपासून दूर राहण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजपाच्या खासदारांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 07:28 AM2022-03-16T07:28:48+5:302022-03-16T07:28:54+5:30
निवडणुकीत खराब कामगिरी असलेल्या १००-१०० मतदान केंद्रांचा अहवाल देण्याचे निर्देश
-नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना पुन्हा एकदा घराणेशाहीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत त्यांनी सांगितले की, माझ्यामुळेच भाजप नेत्यांच्या मुलांना तिकीट मिळाले नाही. हे पाप असेल, तर ते मी केले आहे.निवडणुकीत खराब कामिगरी असलेल्या आपापल्या परिसरातील १००-१०० मतदान केंद्रांचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी भाजप खासदारांना दिले.
या अहवालात मतदान केंद्रावरील खराब कामगिरीमागचे कारण नमूद करावे. घराणेेशाहीचे राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांपासून देशाला धोका आहे. आपल्या पक्षातही याकडे लक्ष द्यावे लागेल. ज्या नेत्यांच्या मुलांना तिकिटे नाकारण्यात आली, त्यांनीही पक्षाच्या विजयासाठी जोमाने काम केले.
बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सर्व खासदारांनी विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल टाळ्यांचा गजर करून पंतप्रधान मोदी यांचे स्वागत आणि अभिनंदन केले. निवडणुकीतील दणदणीत विजयाबद्दल भाजपचे सर्व माजी राष्ट्राध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांनी पंतप्रधान मोदी आणि विद्ममान राष्ट्रीय अध्यचक्ष जे. पी. नड्डा यांना पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले.
राजकारण केल्याचा आरोप
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन गंगा’ अभियानावरून विरोधी पक्षांनी राजकारण केल्याचा आरोप बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी केला.