एका तासात 1 कोटींचं कर्ज मिळणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 06:26 PM2018-11-02T18:26:55+5:302018-11-02T18:28:00+5:30
केवळ 59 मिनिटांत व्यापाऱ्यांना 1 कोटी रुपयांचे कर्ज मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
नवी दिल्ली- पंतप्रधाननरेंद्र मोदी आज सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) मोठी घोषणा केली आहे. तसेच व्याजावरच्या अनुदानासहीत इतर मोठ्या घोषणाही मोदींनी केल्या आहेत. त्यामध्ये केवळ 59 मिनिटांत व्यापाऱ्यांना 1 कोटी रुपयांचे कर्ज मिळेल, असे पंतप्रधाननरेंद्र मोदींनी सांगितले. एमएसएमई क्षेत्राला गती देण्यासाठी आणि रोजगारसाठीही या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना ही नव्या कर्ज योजनेची घोषणा केली. सध्या केंद्रीय अर्थ मंत्रालय या प्रस्तावावर काम करत आहे. एमएसएमई सेक्टरमध्ये 6.3 कोटींहून अधिक युनिट्स आहेत आणि 11.1 कोटी लोकांना या युनिट्समधून रोजगार मिळतो. जीडीपीतही या क्षेत्राचं 30 टक्के योगदान आहे.
उत्पादनातही या क्षेत्राची 45 टक्के भागीदारी आहे. देशातील एकूण निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये या क्षेत्राचं 40 टक्के योगदान आहे. एमएसएमई युनिट्स समोर कर्जाची सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे उद्योगाला उपयुक्त कर्ज अनुदानाच्या माध्यमातून मिळाल्यास या क्षेत्राला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. दरम्यान, जास्त व्याजावर अनुदान दिल्यास कर्जे स्वस्त होतील आणि एमएसएमई क्षेत्रात कर्ज घेण्याचं प्रमाण वाढीस लागणार आहे.