पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीची होणार चौकशी
By admin | Published: January 9, 2017 01:59 PM2017-01-09T13:59:30+5:302017-01-09T14:01:56+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्री प्रकरणात केंद्रीय सूचना आयोग(सीआयसी)ने 1978चे डीयू रेकॉर्डच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्री प्रकरणात केंद्रीय सूचना आयोग(सीआयसी)ने 1978चे डीयू रेकॉर्डच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सीआयसीने दिल्ली विद्यापीठातील 1978ला बीएची पदवी मिळवणा-या सर्व विद्यार्थ्यांच्या रेकॉर्डच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विद्यापीठानुसार, 1978लाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बीएची पदवी संपादन केली आहे.
विद्यापीठाच्या केंद्रीय जनसूचना अधिका-यानं ही विद्यार्थ्यांची व्यक्तिगत माहिती असल्याचं केलेलं अपील आयोगानं फेटाळलं आहे. सीआयसीने विद्यापीठातून 1978ला बीए उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे रोल नंबर, नाव, वडिलांचे नाव, मिळालेले टक्क्यांसह सर्व माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.
नीरज यांनीही आरटीआयअंतर्गत 1978मध्ये बीएची पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, परीक्षेचा निकाल, क्रमांक, नाव, वडिलांचे नाव अशी माहिती मागवली होती. त्यावेळी विद्यापीठाच्या केंद्रीय जनसूचना अधिका-यानं ही विद्यार्थ्यांची व्यक्तिगत माहीत असल्याचं सांगत देण्यापासून नकार दिला होता.
तसेच विद्यार्थ्यांची माहिती दिल्यामुळे पीआयओकडून विद्यार्थ्यांचे व्यक्तिगत आयुष्याचं उल्लंघन होत असल्याचे कोणतेही पुरावे प्राप्त झाले नसल्याचंही यावेळी माहिती आयुक्तांनी सांगितलं. आयोगासमोर सुनावणीदरम्यान सीपीआयओ मीनाक्षी सहाय्य म्हणाल्या, यंदा बीएच्या परीक्षेला दोन लाख विद्यार्थी बसले होते. त्यामुळे 1978मध्ये परीक्षेला बसलेल्या विद्यार्थांचे नाव, उत्तीर्ण, अनुतीर्णची माहिती देणं अवघड आहे. 1978ची परीक्षा डिजिटल स्वरूपातही झाली नसल्याचं त्या म्हणाल्या. दरम्यान, डीयू रजिस्ट्रार तरुण दासने गेल्या वर्षी सांगितलं होतं की, आम्ही रेकॉर्ड तपासला आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी प्रामाणिक असल्याचं आम्हाला समजलं, 1978मध्ये ते परीक्षा उत्तीर्ण झाले आणि 1979मध्ये त्यांनी पदवी संपादन केली.