मीरतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उभारणार भव्य मंदिर, चाहत्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 06:12 PM2017-10-04T18:12:57+5:302017-10-04T18:38:28+5:30
मीरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारण्याचा निर्णय येथील एका त्यांच्या चाहत्यांने घेतला आहे. निवृत्त सहाय्यक अभियंता जेपी सिंह असे या चाहत्याचे नाव असून त्यांनी हा निर्णय घेतला असून या मंदिरात नरेंद्र मोदी यांचा 100 फूट उंचीचा धातूचा पुतळा असणार आहे.
सिंचन विभागातून निवृत्त झालेले सहाय्यक अभियंता जेपी सिंह यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, जगभरातील लाखो लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाइक करतात. त्यांनी आतंरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाची सकारात्मक प्रतिमा सादर केली आहे. तसेच, त्यांच्या देश सेवेला प्रभावित होऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील मीरत-करनाल महामार्गावर सारधाना परिसरात नरेंद्र मोदींचे मंदिर उभारण्यात येणार आहे. याचबरोबर या पवित्र जागेत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती असणार आहे. तसेच, नरेंद्र मोदींच्या या मंदिराची पायाभरणी येत्या 23 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे, असे जेपी सिंह यांनी सांगितले.
मंदिर बांधकामासाठी सुरुवातीला 10 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी देणग्यांच्या माध्यमातून हा निधी उभारण्यात येणार आहे. अनेक लोकांनी यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, या मंदिराचे काम दोन वर्षांत पूर्ण होणार आहे, असे जेपी सिंह म्हणाले. आम्ही जमीन आणि पैशाची व्यवस्था केली आहे. तसेच, या मंदिराचे कामकाल एका ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येईल. त्यासाठी येत्या गुरुवारी अधिकृत नोंदणी सुद्धा करण्यात येणार आहे, असे जेपी सिंह यांनी सांगितले. मात्र, त्यांनी या ट्रस्टबाबत अधिक माहिती सांगण्यास नकार दिला.
दरम्यान, दुसरीकडे गुजरातमध्ये नर्मदा नदीजवळ 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या नावाने सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक उभारण्यास सुरुवात केली आहे. या स्मारकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे.