पंतप्रधान मोदींची जादू कायम : ३ राज्यांत कमळ फुलले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 05:39 AM2023-03-03T05:39:53+5:302023-03-03T05:40:26+5:30
त्रिपुरात पूर्ण बहुमत; नागालँडमध्ये युती; तर मेघालयात संगमा यांनीच मागितले भाजपकडे सत्तेसाठी समर्थन
- संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू अद्यापही देशात कायम असून, ईशान्येतील तीन राज्यांत पुन्हा एकदा भाजप व भाजप समर्थित आघाडीची सरकारे स्थापन होत आहेत. त्रिपुरात भाजपला पूर्ण बहुमत, नागालँडमध्ये भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाले व मेघालयात कॉनराड संगमांचे एनपीपी सरकार स्थापण्यासाठी भाजपबरोबर जाऊ शकते, असे दिसते.
मेघालयात एनपीपीचे नेते मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून चर्चा केली व सरकार स्थापनेसाठी भाजपचे समर्थन मागितले.
अंदाज खरे ठरले...
एक्झिट पोलच्या अंदाजाच्या जवळपासच तिन्ही राज्यांचे निकाल आले. त्रिपुरात भाजपची सत्तेत वापसी हा मोठा विजय आहे. यावेळी काँग्रेस व डाव्या आघाडीशी लढत देताना व तिरपा मोथांच्या आदिवासी जागांवर मते खाण्यामुळे सत्तावापसीचा रस्ता कठीण दिसत होता. भाजपने वेळीच विप्लव देव यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून माणिक साहा यांना त्या पदावर बसविले. त्यांच्या नेतृत्वात भाजपची त्रिपुरात सत्तेत वापसी झाली आहे.
हे आहे यशाचे सूत्र?
n नरेंद्र मोदी देशाचे असे पहिले पंतप्रधान आहेत, जे सर्वांत जास्त ईशान्येकडील राज्यांच्या दौऱ्यावर गेले. तसेच केंद्रीय मंत्र्यांना वारंवार या राज्यांमध्ये पाठवत आले आहेत. लूक नॉर्थ इस्टचे धोरण अवलंबले. चीनच्या आक्रमणाचा फटका सहन करणाऱ्या अरुणाचल प्रदेशमध्ये मोठ्या संख्येने लष्कर तैनात केले.
n सीमेवर विकासकामे व सीमावर्ती गावांना व्हायब्रंट व्हिलेज करण्यासाठी तेथे पायाभूत सुविधांचे जाळे विणले जात आहे. मोदींना ईशान्येबाबत वाटणारी चिंता व काम जनतेने स्वीकारले.
तिन्ही राज्यांचे मुख्यमंत्री
पुन्हा मुख्यमंत्री होणार
त्रिपुरा : विजयानंतर स्वच्छ प्रतिमा असलेले मुख्यमंत्री माणिक साहा यांनाच पुन्हा मुख्यमंत्री केले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याच नेतृत्वात भाजपने विजय मिळविला. ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आहेत. ते सर्जन आहेत व निवडणुकीच्या काळातही गरजू लोकांची त्यांनी सर्जरी केली.
नागालँड : भाजप व एनडीपीपी युती स्पष्ट बहुमताने सत्तेत परतत आहे. मुख्यमंत्री नेफ्यू रियो हेच पुन्हा नागालँडचे मुख्यमंत्री निवडले जाऊ शकतात.
मेघालया : कॉनराड संगमा यांचा एनपीपी सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. काँग्रेस व तृणमूल काँग्रेसलाही तेथे काही जागा मिळाल्या आहेत. परंतु, पुढील राजकारण पाहता संगमा यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली.