पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सल्लागार पी.के.सिन्हा यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 05:38 PM2021-03-16T17:38:01+5:302021-03-16T17:39:20+5:30
यापूर्वी सिन्हा यांनी मंत्रिमंडळ सचिव म्हणूनही सांभाळली होती जबाबदारी
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे प्रधान सल्लागार पी.के. सिन्हा यांनी मंगळवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९७७ च्या बॅचचे ते अधिकारी आहेत. सिन्हा यांना सप्टेंबर २०१९ मध्ये पंतप्रधानांच्या प्रधान सल्लागारपदी नियुक्त करण्यात आलं होतं. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणूनही कर्तव्य बजावलं आहे. तसंच त्यांनी चार वर्ष मंत्रिमंडळ सचिव म्हणूनही काम पाहिलं आहे. याव्यतरिक्त सिन्हा हे ऊर्जा मंत्रालयात सचिवपदीही कार्यरत होते.
सिन्हा यांनी १३ जून २०१५ ते ३० ऑगस्ट २०१९ या कालावधीत मंत्रिमंडळ सचिव म्हणून काम पाहिलं आहे. सिन्हा हे उत्तर प्रदेश कॅडरच्या १९७७ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत सरकारच्या निरनिराळ्या खात्यांमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.
Former Cabinet Secretary and Principal Advisor in the Prime Minister's Office (@PMOIndia), P.K. Sinha, has resigned from his post on personal grounds. pic.twitter.com/31x8ZnZfvY
— IANS Tweets (@ians_india) March 16, 2021
पी.के. सिन्हा हे पंतप्रधान कार्यालयातील दुसरे असे अधिकारी आहेत ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी पंतप्रधान कार्यालयात मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेले नृपेंद्र मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सिन्हा यांना मे २०१५ मध्ये दोन वर्षांसाठी मंत्रिमडळ सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला. त्यानंतर २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधान सल्लागारपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टिफन्स महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. नंतर त्यांनी आपल्या सेवेदरम्यान, पब्लिक अॅ़डमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदविका आणि सोशल सायन्समध्ये एम. फिल.चं शिक्षण पूर्ण केलं.