गतिमान युगात वैज्ञानिक संशोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सबुरीचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 03:17 AM2019-11-06T03:17:01+5:302019-11-06T03:17:36+5:30
चांद्रयान-२ भारतासाठी मैलाचा दगड : समाजोपयोगी संशोधन जगाला द्यावे
सीमा महांगडे
कोलकाता : आजचे जग हे गतिमान जग आहे. कुठे २ मिनिटांत मॅगी मिळते, तर कुठे ३० मिनिटांत पिझ्झा हवा असतो. मात्र, संशोधन ही फटाफट मिळण्याची गोष्ट नाही. त्यामुळे वैज्ञानिक आणि संशोधकानी हवा तितका वेळ घ्यावा आणि समाजोपयोगी असे संशोधन जगाला द्यावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिक व संशोधकांना, तसेच भावी पिढीला दिला. पाचव्या आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव यंदा ५ ते ८ नोव्हेंबर असे चार दिवस कोलकाता येथे विश्व बांगला कन्व्हेंशन सेंटर आणि सायन्स सिटी येथे भरविण्यात आला आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगला कन्व्हेंशन सेंटर येथून महोत्सवाला उपस्थित विद्यार्थी, वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक यांच्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संवादाची सुरुवात बंगाली भाषेतून करत उपस्थितांची मने जिंकली आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या आयोजकांचे प्रथम त्यांनी निवडलेल्या या वर्षीच्या थीमसाठी कौतुक केले. संशोधन, विज्ञान, नावीन्यपूर्ण उपक्रम (रिसर्च, सायन्स, इनोव्हेशन) हे देशाला बळकटी देतात आणि याच प्रमुख विषयांवर यंदाच्या महोत्सवातील उपक्रम आहेत. सरकार इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शन या दोन्ही गोष्टींसाठी प्रयत्नशील असून, त्यासाठी आवश्यक तितकी संस्थांतर्गत मदत देत आहे. सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे असे वातावरण नवीन पिढीला तयार करून देणे आवश्यक आहे, जेथे विद्यार्थी सहावीपासून अटल टिंकरिंग लॅबमध्ये जाईल आणि कॉलेजच्या दिवसांत इन्क्युबेशन, स्टार्टअपच्या जगात प्रवेश करेल. याचसाठी आत्तापर्यंत ५ हजारांहून अधिक शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्यात आल्याची माहिती मोदी यांनी दिली.
आपल्या संविधानाला ७० वर्षे पूर्ण होत असून, संविधानात सायंटिफिक टेम्पर जपणे गरजेचे असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे तो जपणे सगळ्यांची संविधानिक जबाबदारी असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. वैज्ञानिक दृष्टिकोन अंधश्रद्धा संपवितो, समाजात कार्यशीलता वाढवितो, त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे स्वत:चे महत्त्व असून त्याचा दर्जा आणखी उंचाविणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले. चांद्रयान २ मोहिमेत काही तांत्रिक कारणांमुळे बाधा आली. मात्र, मुलांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता, वैज्ञानिक दृष्टिकोन, उत्सुकता पाहून चांद्रयान २ मोहीम यशस्वी झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
गरज ही आविष्काराची जननी
गरज ही कोणत्याही आविष्काराची म्हणजेच संशोधनाची जननी असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, आजच्या जगात संशोधनामुळेच आवश्यकतेच्या मर्यादाची व्याप्ती वाढत असल्याचे मोदी यांनी इंटरनेटचे उदाहरण देत म्हटले. त्यामुळे विज्ञान आणि समाजाचा खूप जवळचा संबंध असून, यामुळेच देश विकसित होणार आहे. विज्ञान आणि संशोधनामध्ये अपयश कधीच नसते, त्यात फक्त प्रयोग आणि प्रयत्न असतात. विज्ञानातील शोध, संशोधन हे फटाफट पूर्ण नाही झाले तरी चालतील, त्याऐवजी त्यांचा दीर्घकालीन उपयोग समाजाला कसा होईल, याचा विचार संशोधकानी करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
खगोलशास्त्राच्या तासाची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
कोलकाता : आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सर्वात मोठ्या खगोलशास्त्राच्या तासाचे आणि स्पेक्टरोस्कोपी तयार केल्याची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. कोलकात्यातील सायन्स सिटीमध्ये एकाच वेळी १ हजार ५९८ विद्यार्थ्यांनी या वर्गात सहभाग नोंदविला. स्पेक्टरोस्कोपीच्या साहाय्याने वैज्ञानिक हजारो प्रकाशावर्षे दूर असलेल्या ताऱ्यावरील तापमान, रासायनिक रचना अभ्यासतात. तशाच प्रकारची स्पेक्टरोस्कोपी विद्यार्थ्यांनी कार्डबोर्ड, कॉम्पॅक्ट डिस्क यांच्या साहाय्याने बनविली. हे रेकॉर्ड सी.व्ही. रमण आणि मेघनाथ सहा यांना समर्पित करण्यात आले.
सायन्स सिटी येथे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केले. देशातील विविध वैज्ञानिक संस्थांनी यात सहभाग नोंदविला असून, त्यांच्या संधोधनाचे प्रदर्शन येथे भरविण्यात आले आहे. मानवाचे रोजचे जगणे सुलभ करणारे संशोधन लोकांसमोर येत नाही ही खंत आहे. प्रयोगशाळेत वैज्ञानिकांनी घेतलेले श्रम त्याग आणि कल्पकता लोकांसमोर येत नाही, ती यायला हवी याच उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची प्रतिक्रिया हर्षवर्धन यांनी यावेळी दिली. त्यानंतर विविध देशांच्या राजदूत आणि मंत्र्यांसोबतच्या परिषदेतही त्यांनी आपले मत मांडले. यावेळी भुटाणचे शिक्षणमंत्री जय भीर राय, मालदीवच्या तंत्रज्ञानमंत्री माले जमाल, म्यानमारचे शिक्षणमंत्री, कोरियाचे राजदूत, ब्रिटनचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रो. लॉगहेड आदी उपस्थित होते. येणाºया भविष्याचा पाय हा विज्ञानातच आहे, असे मत लॉगहेड यांनी व्यक्त केले.