मोदींच्या शपथविधीवेळी टॉयलेट, लाईट्स, साऊंड अन् फुलांवर किती खर्च झाला माहित्येय का? RTI मधून माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 04:51 PM2022-01-20T16:51:59+5:302022-01-20T16:52:36+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१९ साली दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. मे २०१९ मध्ये राष्ट्रपती भवनात भाजपा सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता.
बंगळुरू-
पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१९ साली दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. मे २०१९ मध्ये राष्ट्रपती भवनात भाजपा सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता. पण या शपथविधी सोहळ्यावर नेमका किती खर्च करण्यात आला होता याची माहिती अखेर आज माहिती अधिकाराच्या (RTI) अंतर्गत समोर आली आहे.
बंगळुरुतील माहिती अधिकार कार्यकर्ते टी. नरसिंह मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीवेळी झालेल्या खर्चाची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आता उत्तर देण्यात आलेलं असलं तरी अजूनही सविस्तर उत्तर त्यांना मिळालेलं नाही असा दावा मूर्ती यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यावर राष्ट्रपती भवन परिसरात उभारण्यात आलेले मोबाइल टॉयलेट्स, कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेले लाइट्स, साऊंड सिस्टम आणि फुलांची सजावट यावर ७३ लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते मूर्ती यांनी ३० मे २०१९ रोजी पहिल्यांदा मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यावर झालेल्या खर्चाची विचारणा करण्यासाठी माहिती अधिकारात अर्ज दाखल केला होता. यात त्यांनी संपूर्ण सोहळ्यावर झालेला खर्च सविस्तर देण्यात यावा अशी मागणी केली होती. यात कार्यक्रमस्थळी उपस्थितांना देण्यात आलेला चहा, खानपान (शाकाहारी, मांसाहारी), एकूण पाहुणे, परदेशी निमंत्रित मंडळी, त्यांच्या विमान प्रवासाचा खर्च, वाहतूक खर्च, लाइट, साऊंड, फुलांची सजावट, निमंत्रण पत्रिका आणि इत्यादी. अशा सर्व खर्चांची सविस्तर माहिती द्यावी अशी याचिका माहिती अधिकाराअंतर्गत करण्यात आली होती.