पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या "चहा टपरी"चा होणार कायापालट
By admin | Published: April 22, 2017 10:59 AM2017-04-22T10:59:35+5:302017-04-22T11:13:16+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे त्या स्टेशनसाठी तब्बल 8 कोटी रुपये खर्चून कायापालट करण्यात येणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 22 - पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या स्टेशनवर चहा विकायचे त्या स्टेशनचा लवकरच कायपालट होणार आहे. नरेंद्र मोदी आपल्या लहानपणी ज्या स्टेशनवर चहा विकायचे त्याचं नाव "वडनगर रेल्वे स्टेशन". वडनगर रेल्वे स्टेशनला एक नवं रुप देण्यासाठी सरकारकडून 8 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा शुक्रवारी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी केली.
वडनगर रेल्वे स्टेशनचा विकास करण्यासाठी जवळपास 8 कोटी रुपये स्वीकारण्यात आल्याचीही माहिती त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान दिली. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा "वडिलांसोबत वडनगर स्टेशनवर चहा विक्री केली", असा उल्लेख केला आहे. ही पंतप्रधान मोदींची जन्मभूमीदेखील आहे.
दरम्यान, प्रकल्पाच्या अन्य माहितीबाबत सांगताना अहमदाबादचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक दिनेश कुमार यांनी सांगितले की, मेहसाना जिल्ह्यातील परिसरासहीत वडनगरचा विकास करण्यासाठी जवळपास 100 कोटी रुपये एवढा खर्च येईल. वडनगर रेल्वे स्टेशनचा विकास वडनगर, मोधेरा आणि पाटण ही ठिकाणं विकसित करण्यातील प्रमुख कामांपैकी एक काम आहे. पर्यटन मंत्रालयानं स्टेशनचे रुप बदलण्यासाठी पर्यटन विभागाला आतापर्यंत 8 कोटी रुपये दिल्याचीही माहिती त्यांनी दिली.
यावेळी, प्रवासी ट्रेनसहीत मालवाहतूक करणा-या ट्रेनचेही वेळापत्रक लागू करण्यावर विचार सुरू असल्याचेही सिन्हा यांनी सांगितले. दरम्यान सध्या मालवाहक ट्रेन यांचे कोणतेही निश्चित असे वेळापत्रक आखलेले नसल्याने त्यांची सेवा कोणत्याही वेळात सुरू असते. आम्ही एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे, ज्यानुसार तीन ते चार ट्रेन वेळापत्रकानुसार चालतील. या प्रकल्पाच्या विश्लेषणानंतर आम्ही सर्व मालवाहक ट्रेन्ससाठी अशाचप्रकारची प्रणाली लागू करण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती सिन्हा यांनी दिली.