पंतप्रधान म्हणतात भारतीय तरूणांचे उज्वल भविष्य माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातच

By admin | Published: May 11, 2017 07:52 PM2017-05-11T19:52:35+5:302017-05-11T19:52:35+5:30

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी स्वत:ला संलग्न करण्यातच भारतीय तरूणांचे भवितव्य उज्वल ठरणार आहे, असे स्वप्नरंजन नुकतेच पंतप्रधानांनी ऐकवले मात्र भारतातले माहिती तंत्रज्ञान क्षेत्र

The Prime Minister says the bright future of youngsters in the information technology sector | पंतप्रधान म्हणतात भारतीय तरूणांचे उज्वल भविष्य माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातच

पंतप्रधान म्हणतात भारतीय तरूणांचे उज्वल भविष्य माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातच

Next

सुरेश भटेवरा/ ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 : माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी स्वत:ला संलग्न करण्यातच भारतीय तरूणांचे भवितव्य उज्वल ठरणार आहे, असे स्वप्नरंजन नुकतेच पंतप्रधानांनी ऐकवले मात्र भारतातले माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आजवरच्या सर्वाधिक कठीण संकटाशी सध्या झुंज देत आहे. या क्षेत्रातल्या नामांकित कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची मोठया प्रमाणात कपात सुरू केली आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस होत असलेले आॅटोमेशन आणि अमेरिकन हायरींगसाठी मोजावे लागणारे अधिक वेतन यामुळे नोकर कपातीचा आकडा वाढतच जाणार असून साऱ्या आयटी क्षेत्रावर मंदी आणि निराशेचे सावट आहे.
डिजिटल इंडिया हा पंतप्रधान मोदींचा स्वप्नांकित प्रकल्प (ड्रीम प्रोजेक्ट). याच मालिकेत सुप्रिम कोर्टाला पेपरलेस बनवणाऱ्या इंटिग्रेटेड केस मॅनेजमेंट या आधुनिक व्यवस्थेचा शुभारंभ करतांना पंतप्रधानांनी नुकताच इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) + इंडियन टॅलंट (आयटी) = इंडिया टुमारो (आयटी). हा नवा मंत्र देशातल्या तरूणांना दिला. या मंत्राव्दारे पंतप्रधानांनी तरूणांना आशेचा किरण दाखवला तरी प्रत्यक्षात या क्षेत्राची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. याची मुख्य कारणे दोन. पहिले अमेरिका, युरोपियन देश, आॅस्ट्रेलिया, सिंगापूर इत्यादी देशात स्थानिक बेरोजगारीचे कारण पुढे करीत, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारतीय इंजिनिअर्सना सध्या टार्गेट केले जात आहे. तर दुसरे कारण प्रगत तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात आॅटोमेशनचे प्रमाण वाढले असल्याने पूर्वी जे काम करण्यासाठी १00 सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची गरज होती तेच काम आता कुठे १0 तर कुठे केवळ एक इंजिनिअर देखील पुरे करू शकतो अशी स्थितीआहे. पंतप्रधानांचा नवा मंत्र तरूणांना आयटी क्षेत्राची भुरळ घालणारा असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका ताज्या संशोधनानुसार २0२0 पर्यंत आयटी क्षेत्रात भारतातल्या २0 ते ३0 टक्के कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आपले रोजगार गमवावे लागणार आहेत. तरूण पिढीला बौध्दिक क्षेत्रात लवकरच नवे तळ शोधावे लागतील, अशी जाणीव या क्षेत्रातल्या जाणकार तज्ज्ञांनीही करून दिली आहे.
नवे शतक उजाडल्यापासून गेल्या सोळा वर्षात तरूण पिढीला सर्वाधिक नोकऱ्या व रोजगार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रानेच पुरवल्या. २0२0 उजाडायला अद्याप ३ वर्षे बाकी आहेत, तरीही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतातल्या नामांकित कंपन्यांनी आपल्या नोकऱ्यांमधे आजच मोठया प्रमाणावर कपात सुरू केली आहे. जसजसे आॅटोमेशनचे प्रमाण वाढत जाईल, या क्षेत्रातल्या रोजगारांमधे व्यापक कपात होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आयटी क्षेत्रातल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना मोठया संख्येत रोजगार पुरवणाऱ्या कॉग्निजंट कंपनीने गेल्याच सप्ताहात आपल्या १ हजार उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती (व्हॉलंटरी सेपरेशन)साठी प्रवृत्त केले लवकरच ही संख्या ६ हजारांवर पोहोचेल, असा अंदाज आहे. खर्चात कपात करण्यासाठी विप्रो व इन्फोसिसने देखील आपल्या कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स रिव्हयु गांभीर्याने सुरू केला आहे. विप्रो लवकरच आपल्या ६00 कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत आहे याखेरीज विप्रोच्या २ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना लवकरच कपातीला सामोरे जावे लागणार आहे. इन्फोसिसने कामकाजात अल्प कौशल्य दाखवणाऱ्या १0 टक्के कर्मचाऱ्यांची यादी करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे इन्फोसिसच्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमावण्याच्या भीतीने ग्रासले आहे.
 

Web Title: The Prime Minister says the bright future of youngsters in the information technology sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.