राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देत पंतप्रधानही 'रन फॉर युनिटी'मध्ये सहभागी
By admin | Published: October 31, 2014 09:10 AM2014-10-31T09:10:39+5:302014-10-31T10:38:41+5:30
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सर्व देशवासियांना एकात्मतेची शपथ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही 'रन फॉर युनिटी'मध्ये सहभाग घेतला.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सर्व देशवासियांना एकात्मतेची शपथ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही 'रन फॉर युनिटी'मध्ये सहभाग घेतला. यावेळी अर्थ व संरक्षण मंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, दिल्लीचे उप राज्यपाल नजीब जंग हेही उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा करण्यात येत आहे. यावेळी पंतप्रधानांनी संसद भवनाजवळील पटेल चौक येथे सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोदींनी त्यांनाही आदरांजली वाहिली.
विजय पथावर 'रन फॉर युनिटी'ला खुद्द पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी देशवासियांना संबोधित केले. ' आर्य चाणक्य यांच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनीच देशाला एकसूत्रात बांधल्याचे सांगच महात्मा गांधी व सरदार पटेल यांची जोडी अद्भुत असल्याचे ते म्हणाले.
जी व्यक्ती इतिहास विसरते ती कधीच इतिहास घडवू शकत नाही. त्यामुळेच आपण ऐतिहासिक नेत्यांचा विसर पडू देऊ नये, असे त्यांनी सांगितले. जरी अनेक राज्य असली तरी आपले राष्ट्र एक आहे, देशात अनेक रंग असले तरीही तिरंगा एकच आहे असे सांगत विविधतेत एकता हीच आपल्या राष्ट्राची ओळख असल्याचे ते म्हणाले. आपण सर्व भारतीय जात, धर्म आणि समाज या मर्यादांच्या ओलांडून एकत्र येऊ, अशी शपथही त्यांनी देशवासियांना दिली.
दरम्यान महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या 'रन फॉर युनिटी मॅरेथॉन'मध्ये राज्याचे नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग घेतला.