पंतप्रधान लवकरच पाच देशांच्या दौऱ्यावर
By admin | Published: May 30, 2016 03:14 AM2016-05-30T03:14:10+5:302016-05-30T03:14:10+5:30
४ जूनपासून ते अफगाणिस्तान, कतार, स्वीत्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या पाच देशांची वारी करणार आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये २६ देशांना भेटी दिल्या असून, अलीकडेच त्यांनी एक छोटेखानी विदेश दौरा आटोपला असताना ४ जूनपासून ते अफगाणिस्तान, कतार, स्वीत्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या पाच देशांची वारी करणार आहेत. अध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरून ते अमेरिकेला भेट देणार आहेत.
१,४०० कोटी रुपये खर्चून अफगाणिस्तानात बांधण्यात आलेल्या सलमा धरणासाठी भारताने निधी दिला असून, मोदी या भेटीत या धरणाचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते ऊर्जासंपन्न कतार आणि स्वीत्झर्लंडला भेट देतील. कतारमधील दोन दिवसांच्या वास्तव्यात ते कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांच्याशी आर्थिक आघाडीवरील करारांसह विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर व्यापक चर्चा करतील. विशेषत: हायड्रोकार्बन क्षेत्रातील करारांवर त्यांचा भर असेल.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी काळा पैसा विदेशातून आणण्याचे आश्वासन दिले होते. स्वीस बँकेत भारतीयांना ठेवलेला काळा पैसा हुडकून काढण्यात सहकार्य देण्याबाबत ते स्वीत्झर्लंडचे अध्यक्ष जोहान स्नीदर अम्मान यांच्याशी चर्चा करतील. करासंबंधी मुद्द्यांबाबत आपसूक माहितीचे आदानप्रदान करता यावे, यासाठी मार्ग प्रशस्त करण्याबाबत दोन देशांच्या अधिकाऱ्यांनी कराराला अंतिम स्वरूप देण्याचा प्रयत्न चालविला आहे. भारत आणि अन्य देशांना कराबाबत आपसूक माहिती देणारी यंत्रणा आणण्यासंबंधी वटहुकुमाबाबत स्वीस सरकारने १८ मेपासून सल्लामसलतीची प्रक्रिया अवलंबली आहे.
>अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत भाषण...
अलीकडेच ओबामा यांनी दिलेल्या निमंत्रणावरून मोदी ७ जून रोजी अमेरिकेला भेट देणार आहेत. ओबामांसोबतच्या बैठकीत संरक्षण, सुरक्षा आणि ऊर्जा या क्षेत्रातील करारासंबंधी प्रगतीचा आढावा घेतला जाईल. मोदींनी यापूर्वी तीन वेळा अमेरिकेला भेट दिली आहे.
>ते अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सभेला संबोधित करतील. परतीच्या प्रवासात ते मेक्सिकोला भेट देणार असून व्यापार आणि गुंतवणुकीवर त्यांचा डोळा असेल. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र महासभेच्यावेळी त्यांनी मेक्सिकोचे अध्यक्ष एन्रीक पेना निएटो यांच्याशी चर्चा केली होती.
मोदींनी २०१५ मध्ये २६ देशांना भेटी देत ते विदेश दौऱ्यांचे वर्ष राहिल्याचे दाखवून दिले.