परराष्ट्र धोरण कौशल्याने हाताळणा-या पंतप्रधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 03:05 AM2017-11-19T03:05:36+5:302017-11-19T07:22:53+5:30
आंतरराष्ट्रीय धोरणाचे विश्लेषक व्ही. पी. दत्त यांनी इंदिरा गांधी यांच्या परराष्ट्र धोरणाचा उल्लेख ‘अत्यंत परिपक्व आणि भारताचे कमीत कमी नुकसान करणारे’ असा केला होता.
- मणिशंकर अय्यर
(माजी केंद्रीयमंत्री)
आंतरराष्ट्रीय धोरणाचे विश्लेषक व्ही. पी. दत्त यांनी इंदिरा गांधी यांच्या परराष्ट्र धोरणाचा उल्लेख ‘अत्यंत परिपक्व आणि भारताचे कमीत कमी नुकसान करणारे’ असा केला होता. बांगलादेशची मुक्ती आणि पाक-रशियाला शिकवलेला धडा, अण्वस्त्र निर्मितीबद्दल घेतलेली भूमिका असे सारेच निर्णय त्यांनी मोठ्या कौशल्याने हाताळले... हीच त्यांची खुबी होती.
पंतप्रधान इंदिरा गांधींच्या विविध क्षेत्रांतील यशांपैकी महत्त्वाचे यश म्हणजे त्यांनी परराष्ट्र धोरणाला दिलेला आकार. त्यातही उल्लेखनीय म्हणजे डिसेंबर १९७१मध्ये जिंकलेल्या बांगलादेश युद्धात पंधरवड्यात मिळालेले यश. या विजयामुळेच त्यांना 'दुर्गामाता' हे सार्थ नामाभिधान मिळाले होते.
पूर्व पाकिस्तानात मुजीबुर रेहमान व अवामी लीगवर पश्चिम पाकिस्तानचा वरंवटा चालू लागल्यावर इंदिरा गांधी यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि संयमाने पावले उचलत बांगलादेशी स्वातंत्र्यसैनिकांच्या मुक्ती वाहिनीला मदत करत तसेच बांगलादेशी राजकीय नेत्यांना भारतात आश्रय देत लष्करी कारवाईसाठी परिस्थिती निर्माण केली. एक कोटी निर्वासितांना तात्पुरता निवारा देऊन बांगलादेशातील स्थिती निवळल्यावर मातृभूमीध्ये पुन्हा जाता येईल, अशा विश्वास त्यांच्यात निर्माण केला. त्यानंतर इंदिराजींनी फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, बेल्जियम, आॅस्ट्रिया अशा युरोपीय देशांचा दौरा त्यांनी केला. अमेरिकेलाही भेट दिली.
मूलतत्त्ववाद्यांच्या मदतीने पाकचे लष्कर पूर्व पाकिस्तानात कसे अत्याचार करत आहे याची माहिती त्यांनी पाश्चिमात्य देशांच्या नेत्यांना दिली. पुढचे पाऊल लष्करी व मुत्सद्दी पातळीवर महत्त्वाचे होते. ९ आॅगस्ट रोजी त्यांनी भारत-सोव्हिएत शांतता, मैत्री व सहकार्य करार केला. पाकिस्तानला वाचवायला अमेरिका वा चीन-अमेरिका एकत्र आले तर त्यासाठीची ही तरतूद होती. जगातील विविध नेत्यांना या विषयाचे महत्त्व पटल्यानंतर आणि सैन्याची पूर्ण तयारी झाल्यानंतरच ३ डिसेंबर १९७१ रोजी त्यांनी पाकिस्तानवर आक्रमण केले. अण्वस्त्रसज्ज अशी यूएसएस एन्टरप्राइज युद्धनौका बंगालच्या उपसागरात येऊनही त्या मागे हटल्या नाहीत. स्वतंत्र बांगलादेशातून आपल्या फौजा तीन महिन्यांमध्ये मागे घेऊन आपण पूर्व पाकिस्तानचे केवळ मुक्तीदाते होतो हे दाखवून दिले. युद्धातून उरलेल्या पाकचे नेते झुल्फिकार अली भूट्टो यांना सिमल्यात परिषदेसाठी बोलावून शांततेसाठी प्रयत्नशील असल्याचे संकेतही दिले. जवळपास ५० वर्षांनंतरही सिमला करार हा त्यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांतील चिरकाल यश असल्याचे दिसून येते.
बंगालच्या उपसागरात अमेरिकेची युद्धनौका आल्याने भारताचे अणू सामर्थ्य दाखवण्याची वेळ आली. पोखरणमध्ये १८ मे १९७४ रोजी चाचणी घेऊन भारत अण्वस्त्र सामर्थ्य असणाºया देशांच्या पंगतीत जाऊन बसला. न्यूक्लिअर नॉनप्रोलिफेरेशन ट्रीटी करारावर स्वाक्षरी करण्यास नकार देत एकांगी व भेदभाव करणाºया करारांद्वारे आण्विक शस्त्रकपात शक्य नाही असा संदेश दिला. तरीही अण्वस्त्रकपातीच्या जागतिक चळवळीच्या नेत्या अशी ओळख निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या. अलिप्त राष्ट्र चळवळीचे १९८३ साली अध्यक्षपद स्वीकारल्यावर त्यांनी या चळवळीला जगातील सर्वात मोठी शांतता चळवळ संबोधून सहा देशांच्या पुढाकाराने अण्वस्त्रकपात करून जगाला भयंकर संकटापासून वाचविण्याचे प्रयत्न केले.
१९६६-६७मध्ये प्रथमच भारताचे नेतृत्व स्वीकारल्यावर त्यांनी व्हिएतनाम युद्ध अमेरिकेने थांबवावे व पॅलेस्टाइनला न्याय मिळावा आणि क्युबाचे सार्वभौमत्त्व टिकावे यासाठी प्रयत्न सुरू केले. चीन व भारत यांतील दरी इंदिरा गांधी यांच्याच काळात मिटायला सुरुवात झाली. चीनच्या बाबतीत त्यांनी काळजीपूर्वक पावले टाकली.
रशियाशी संबंधही काळाच्या कसोटीवर तपासले. डिसेंबर १९७९ साली सोव्हिएत फौजा अफगाणिस्तानात घुसल्या तेव्हा भारत-सोव्हिएत युनियन संबंध ताणले गेले. त्यानंतर काही काळातच इंदिराजी पुन्हा सत्तेत आल्या. त्यांनी सोव्हिएत युनियनचा निषेध करणाºया जागतिक कोरसमध्ये जाण्यास नकार दिला. परंतु अफगाणिस्तानात घुसून सार्वभौमत्वावर केलेले आक्रमण मागे घ्यावे असे रशियन नेतृत्वाला त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
इंदिरा गांधींच्या काळातील आंतरराष्ट्रीय धोरणाचे विश्लेषक व्ही. पी. दत्त यांनी ‘अ सेंटेनरी हिस्टरी आॅफ द काँग्रेस’ या ग्रंथात त्यांच्या धोरणांचे वर्णन अत्यंत परिपक्व आणि भारताचे कमीत कमी नुकसान करणारे धोरण असे केले आहे. ते म्हणतात, 'असं नाही की तेव्हा चुका झाल्याच नाहीत, परंतु त्यापेक्षा भारताचा लाभ होण्यासाठी अत्यंत कौशल्याने व आत्मविश्वासाने परराष्ट्र धोरणातील आव्हाने हाताळली गेल्यामुळे त्यांच्यावर मात करता आली.'
(शब्दांकन - ओंकार करंबेळकर)