शेतकऱ्यांच्या समस्यांकडे वेधले पंतप्रधानांचे लक्ष

By admin | Published: May 5, 2017 01:31 AM2017-05-05T01:31:48+5:302017-05-05T01:31:48+5:30

देशातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या तसेच महाराष्ट्रात सक्त वसुली संचलनालयातर्फे घातल्या जाणाऱ्या धाडींमधे घडलेल्या गैरप्रकारांकडे

Prime Minister's attention to farmers' problems | शेतकऱ्यांच्या समस्यांकडे वेधले पंतप्रधानांचे लक्ष

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे वेधले पंतप्रधानांचे लक्ष

Next

सुरेश भटेवरा /नवी दिल्ली
देशातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या तसेच महाराष्ट्रात सक्त वसुली संचलनालयातर्फे घातल्या जाणाऱ्या धाडींमधे घडलेल्या गैरप्रकारांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. सुमारे अर्धातास चाललेल्या या भेटीत पवारांनी मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी, सिंचनाच्या सोयी, शेतमालाच्या हमी भावात वाढ, शेतीसाठी स्वस्त दरात कर्ज आदी उपाययोजनांचा आग्रह धरला.
या महत्वपूर्ण भेटीत मोदींना उद्देशून पवार म्हणाले, देशातला शेतकरी वर्ग संकटात आहे. वर्षभरात जवळपास १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी ४२९१ शेतकरी महाराष्ट्रातले आहेत. कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यातही परिस्थिती गंभीरच आहे. केंद्र सरकारने या संदर्भात तातडीची उपाययोजना केली नाही तर हा प्रश्न स्फोटक बनेल. पवार पंतप्रधानांना म्हणाले, युपीए सरकार सत्तेवर असतांना देशातल्या शेतकऱ्यांचे ७0 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. याखेरीज अन्य उपायांचीही अमलबजावणी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले होते. उत्तरप्रदेशात भाजपने अलीकडेच शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची घोषणा केली. साहजिकच देशभर संकटात असलेल्या शेतकरी वर्गाला आता उत्तरप्रदेशच्या धर्तीवर कर्जमाफी हवी आहे, असे सांगत त्यांनी महाराष्ट्रातल्या तूर खरेदीच्या समस्येकडेही पंतप्रधानांचे लक्ष वेधले. पवारांच्या साऱ्या सुचना शांतपणे ऐकल्यावर पंतप्रधान म्हणाले, केंद्र विविध उपाययोजनांवर लक्ष केंद्र्रीत करीतच आहे.
तथापि या समस्यांच्या सोडवणुकीसाठी पवारांनी स्वत: पुढाकार घेतल्यास सरकारला मदत होईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही पवारांनी मार्गदर्शन करावे, महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करायला केंद्र सरकार तयार आहे, असे आश्वासनही पंतप्रधानांनी पवारांना दिले.

ईडीच्या धाडींतील गैरप्रकारांची तक्रार

मुंबई व महाराष्ट्रात सध्या सक्त वसुली संचलनालयाचे (ईडी) धाडसत्र सुरू आहे. करबुडव्यांवर धाडी घालण्याची कारवाई कायदेशीर असली तरी या धाडी दरम्यान धाकदपटशाचा मार्ग अवलंबून अधिकाऱ्यांतर्फे संबंधितांना लुबाडण्याच्या गंभीर घटना घडत असल्याचे कानावर येत आहे, अशी गंभीर तक्रार नोंदवीत पवार पंतप्रधानांना म्हणाले, सक्त वसुली संचलनालयातर्फे महाराष्ट्रात यापूर्वी असा अतिरेक कधी घडलेला नाही. त्यावर पंतप्रधान म्हणाले, अशाच काही तक्रारी माझ्याही कानावर आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही संबंधित विभागातर्फे देण्यात आले आहेत.

Web Title: Prime Minister's attention to farmers' problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.