प्रधान सचिवाला लाचप्रकरणी अटक
By Admin | Published: September 18, 2015 02:39 AM2015-09-18T02:39:46+5:302015-09-18T02:39:46+5:30
बंद केलेली खाण पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नातून भ्रष्टाचाराची खाण खणण्याचा नोकरशाहीचा धक्कादायक उद्योग उजेडात आला आहे. लाच म्हणून दिलेली तब्बल चार कोटी २८
जयपूर : बंद केलेली खाण पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नातून भ्रष्टाचाराची खाण खणण्याचा नोकरशाहीचा धक्कादायक उद्योग उजेडात आला आहे. लाच म्हणून दिलेली तब्बल चार कोटी २८ लाखांची रक्कम हस्तगत करण्यात आलेल्या या प्रकरणातून नोकरशाही किती वरपर्यंत पोखरली आहे, हेही अधोरेखित झाले आहे. राजस्थानचे प्रधान सचिव (खाण) अशोक सिंघवी यांना गुरुवारी पहाटे लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने (एसीबी) अटक केल्यानंतर या लाच प्रकरणाचे गांभीर्य कमालीचे वाढले आहे.
१९८३ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेले सिंघवी हे उदयपूर येथील राजस्थान राज्य खाण आणि खनिज लिमिटेडचे चेअरमनदेखील आहेत. सिंघवी यांच्या विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण पाच जणांना
बुधवारी उदयपूर आणि रिलवाडा
येथील लाचप्रकरणी अटक करण्यात
आली होती. त्यानंतर बुधवारी रात्री सिंघवी यांना आधी ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती पहाटे त्यांना अटक करण्यात आली. अटकेच्या कारवाईपूर्वी सिंघवींच्या जयपूर येथील निवासस्थानाची झडती घेण्यात आली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.
नंतर एसीबी कार्यालयात नेऊन त्यांना अटक करण्यात आली. आतापर्यंत या लाच प्रकरणातील ४.२८ कोटी रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. या रकमेपैकी २.५५ कोटी रुपये सिंघवी आणि इतरांना देण्यात आले होते.
चित्तोडगड येथील आपली बंद करण्यात आलेली खाण पुन्हा सुरू करण्यासाठी या खाणीचा मालक शेरखान याने ही २.५५ कोटी रुपयांची लाच दिली असल्याचा आरोप आहे. राजस्थानच्या खनन विभागाने शेरखानच्या एकूण सहा खाणींचे लीज रद्द केले होते. कुणी लाच मागितल्याची तक्रार शेरखानने केली नसली तरी आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही ही कारवाई केली, असे एसीबीचे महासंचालक नवदीप सिंग म्हणाले. खान याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्याने ही २.५५ कोटीची लाच आपल्या चार्टर्ड अकाउंटन्टला दिली होती आणि त्याने ती खाण विभागाचा दलाल संजय सेठी याला दिली. नंतर सेठी याने रक्कम उदयपूरचे अतिरिक्त संचालक (खाण) पंकज गहलोत आणि प्रधान सचिव अशोक सिंघवी यांच्याकडे पोहोचती केली, असा आरोप आहे. गेहलोतसह खाण अभियंता पी.आर. अमेटा, सीए श्याम सिंग सिंघवी, संजय सेठी आणि राशीद खान यांना आधीच अटक करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)