गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 02:42 PM2024-11-29T14:42:08+5:302024-11-29T14:42:46+5:30
गुजरातच्या अहमदाबादमध्ये या बनावट नोटा छापल्या जात होत्या.
अहमदाबाद: आतापर्यंत तुम्ही अनेकदा बनावट/खोट्या भारतीय नोटा छापल्याच्या घटना ऐकल्या किंवा वाचल्या असतील. पण, गुजरातमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्स छापल्याप्रकरणी पोलिसांनी एका ऑस्ट्रेलियन नागरिकासह चार जणांना अटक केली आहे. वटवा येथील एका गोदामातून बनावट नोटाही सापडल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपला (एसओजी) अहमदाबादच्या वेजलपूरमध्ये बनावट चलनाची माहिती मिळाली होती. त्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. 24 वर्षीय मजूर रौनक राठोड याला 50 डॉलर्सच्या 119 बनावट ऑस्ट्रेलियन नोटा बदलण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली. खुश पटेल(24) नावाच्या आरीपकडून या बनावट नोटा मिळाल्याचे त्याने चौकशीदरम्यान सांगितले.
यानंतर त्याने पोलिसांना या रॅकेटचा कथित मास्टरमाइंड मौलिक पटेल (36) याच्याकडे नेले. पोलिसांना असे आढळून आले की, मौलिक पटेल ध्रुव देसाई(20) याच्यासोबत वटवा येथील एका कारखान्यात बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्स छापण्याचे काम करतो. यानंतर पोलिसांनी आरोपींसह बनावट नोटा आणि इतर साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत 11,92,500 रुपये असून, त्यात भारतीय चलनातील 2,10,000 रुपये आणि 16,500 रुपये किमतीचे सात मोबाईल फोन्सही आहेत.
बनावट चलनासाठी वापरण्यात आलेले मूळ चलनही पोलिसांनी जप्त केले आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात नवरंगपुरा भागात 500 रुपयांच्या बनावट नोटांच्या माध्यमातून 1.6 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती. बनावट नोटांवर महात्मा गांधींच्या चित्राऐवजी बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांचे छायाचित्र छापण्यात आले होते. 1.6 कोटी रुपयांच्या 2,100 ग्रॅम सोन्याच्या व्यवहारात हा घोटाळा उघडकीस आला.