पाठलाग करण्याआधी विकास बरालाने विकत घेतली होती दारु, सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 02:06 PM2017-08-11T14:06:20+5:302017-08-11T16:02:38+5:30
आयएएस अधिका-याची मुलगी वर्णिका कुंडूसोबत छेडछाड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विकास बराला याच्याविरोधात आणखी एक सबळ पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे
हरियाणा, दि. 11 - आयएएस अधिका-याची मुलगी वर्णिका कुंडूसोबत छेडछाड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विकास बराला याच्याविरोधात आणखी एक सबळ पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. वर्णिकाचा पाठलाग करण्याआधी विकास बराला एका दुकानातून दारु खरेदी करत असताना स्पष्ट दिसत आहे. 4 ऑगस्ट रोजीचं हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे.
या फुटेजमध्ये विकास बराला आपला मित्र आशिष कुमारसोबत चंदिगड सेक्टर 9 मधील एका दुकानातून दारु विकत घेताना दिसत आहे. यामुळे वर्णिकाने विकास बराला दारुच्या नशेत असल्याचा केलेला दावा खऱा ठरत आहे. दरम्यान विकास बराला आणि त्याचा मित्र आशिषला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आयएएस अधिका-याची मुलगी वर्णिका कुंडूसोबत छेडछाड केल्याच्या आरोपाखाली भाजपा नेता सुभाष बराला यांचे सुपुत्र विकास बराला याला अटक करण्यात आली आहे. विकास बराला याच्यासोबत त्याचा मित्र आशिष यालाही अटक करण्यात आली. पोलिसांनी चौकशीसाठी विकासला पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. दुपारी अडीच वाजता विकास बराला पोलीस ठाण्यात पोहोचला होता. चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. विकास बरालाविरोधात अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचं सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले असून, सीसीटीव्हीत विकास बराला वर्णिकाचा पाठलाग करताना स्पष्ट दिसत आहे.
याआधीही पोलिसांनी विकास बराला आणि त्याच्या मित्राला अटक केली होती. मात्र त्यांच्यावर गुन्हा नोंद केला नसल्याने न्यायालयात हजर न करताच जामीन मंजूर करण्यात आला होता. पोलिसांनी जाणुनबुजून विकास बरालावर अजामीनपात्र गुन्हा नोंद केला नाही असा आरोप होत होता. अखेर पोलिसांनी आयपीसी 365 आणि 511 अन्वये गुन्हा नोंद केला.
याआधी विकासचे वडिल आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष सुभाष बरला यांनी यासंबंधी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपला मुलगा विकास पोलिसांना तपासात संपुर्ण सहकार्य करेल, तसंच दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं होतं. पत्रकार परिषद सुरु असतानाच मुलगा विकासचा फोन आल्याने सुभाष बराला पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून निघून गेले होते.
पत्रकार परिषदेदरम्यान सुभाष बराला यांनी सांगितलं होतं की, 'आम्ही याप्रकरणी कोणतंही राजकारण केलं नसून, कोणताही दबाव टाकलेला नाही. जे आरोप लावण्यात येतील त्यानुसार कारवाई होईल. वर्णिका मुंडू माझ्या मुलीसारखी आहे. जर माझा मुलगा दोषी आढळला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. पोलिसांकडून कोणताही निष्काळजीपणा केला जात नसून योग्य कारवाई केली जात आहे'.
काय आहे प्रकरण -
हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला याच्यावर एका मुलीचा पाठलाग व छेडछाड केल्याचा आरोप आहे. प्रदेशाध्यक्षांचा मुलगा कायद्याचा विद्यार्थी आहे. पीडित मुलगी आयएएस अधिका-याची मुलगी आहे. शुक्रवारी चंदीगडमधील सेक्टर 9 येथून चालली होती. तेव्हा एक टाटा सफारी कार पाठलाग करीत आहे, असे तिच्या लक्षात आले. तिने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलिसांनी दोघांना अटक केली, तेव्हा ते दोघेही दारूच्या नशेमध्ये होते. हरिणाया भाजपाध्यक्ष सुभाष बराला यांनी दिल्लीतल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं.