जेलमध्ये शशिकलांना मिळाली सीरियल किलर शेजारीण
By admin | Published: February 18, 2017 10:01 AM2017-02-18T10:01:30+5:302017-02-18T10:01:30+5:30
बेहिशेबी संपत्तीप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना तुरुंगात खतरनाक गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेली शेजारीण मिळाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 18 - बेहिशेबी संपत्तीप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना तुरुंगात खतरनाक गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेली शेजारीण मिळाली आहे. सायनाइड मल्लिका या नावाने कुख्यात असलेली ही महिला गुन्हेगारी जगतातील पहिली लेडी सीरियल किलर असल्याचे बोलले जाते. यावरुन, राजकीय कारणांमुळे जाणूनबुजून शशिकला यांचा जीव धोक्यात घातला जात आहे, असा मुद्दा त्यांच्या समर्थकांनी उपस्थित केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पराप्पणा अग्रहारा मध्यवर्ती कारागृहातील ज्या महिला बराकीत शशिकला यांना ठेवण्यात आले आहे, त्याशेजारी असणा-या सेलमध्ये के.डी.केपाम्मा उर्फ सायनाइड मल्लिका ही महिला आपली शिक्षा भोगत आहे. सायनाइड मल्लिकाने आतापर्यंत सहाहून अधिक महिलांना शिकार बनवून त्यांना ठार केले आहे. मल्लिका मुख्यतः मंदिरात येणा-या-जाणा-या महिलांना आपला शिकार बनवायची. महिलांशी मैत्री करुन चलाखीने त्यांना सायनाइड खाऊ घालायची आणि त्यांचे पैस, दागिने, महागड्या वस्तूंची चोरी करुन ती फरार व्हायची.
सायनाइड मल्लिकावर बंगळुरू आणि आसपासच्या परिसरात अनेक गुन्हे केल्याची नोंद आहे. निष्पाप महिलांना फसवणा-या या मल्लिकाच्या 2008मध्ये पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मिळालेल्या माहितनुसार, 52 वर्षांची सायनाइड मल्लिका शशिकला यांच्यासोबत मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ती नेहमी शशिकला यांच्या आसपास वावरत असते. जेवणाच्या रांगेतही त्यांना उभे राहू देत नाही, तर स्वतः जाऊन शशिकलांसाठी जेवणाचं ताट आणते. या सर्व प्रकारावर एआयएडीएमकेतील सदस्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, कारागृहाचे अधीक्षक कृष्ण कुमार यांनी सांगितले की, सायनाइड मल्लिकापासून कोणलाही धोका नाही. ज्या सेलमध्ये शशिकला यांना ठेवण्यात आले आहे. त्या सेलमध्ये शशिकलांपूर्वी हत्येचा आरोप असलेल्या उच्चभ्रू वकील शुभा शंकरनारायण यांनी मल्लिकासोबत अनेक वर्ष शिक्षा भोगली.