उत्तर प्रदेशातील कैद्यांना सतावतीये एचआयव्ही एड्सची भीती, जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 12:48 PM2018-08-03T12:48:20+5:302018-08-03T12:49:40+5:30
उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांना सध्या एचआयव्ही एड्सची भीती सतावत आहे. एका रिपोर्टनुसार, यूपीतील वेगवेगळ्या कारागृहांमध्ये एचआयव्ही पॉझिटीव्ह कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
(Image Credit: salamqatar.com)
लखनौ : उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांना सध्या एचआयव्ही एड्सची भीती सतावत आहे. एका रिपोर्टनुसार, यूपीतील वेगवेगळ्या कारागृहांमध्ये एचआयव्ही पॉझिटीव्ह कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रिपोर्टनुसार, यूपीच्या वेगवेगळ्या कारागृहातील तब्बल ४५९ कैदी एचआयव्ही पॉझिटीव्ह आढळले आहेत. ही आकडेवारी समोर आल्यानंतर एकीकडे कैद्यांमध्ये भीती पसरली आहे तर दुसरीकडे कारागृह प्रशासन दावा करत आहे की, कारागृहामध्ये कुणालाही एड्स होऊ शकत नाही.
काही दिवसांपूर्वी बागपत जिल्हा कारागृहात अट्टल गुन्हागार मुन्ना बजरंगी याची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासूनच यूपीतील कारागृहांमध्ये कैद्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कैदी आपल्या सुरक्षेवरुन चिंतेत आहेत. अनेक कैद्यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून सुरक्ष वाढवण्याची मागणी केली आहे. अशातच एड्सबाबतचा रिपोर्ट समोर आल्यानंतर कैद्यांमध्ये आणखीनच भीती निर्माण झाली आहे.
मीडिया स्कॅन अॅन्ड व्हेरिफिकेशन सेलच्या रिपोर्टमधून हा खुलासा झाला आहे की, उत्तर प्रदेशातील कारागृहांमध्ये कैद असलेल्या कैद्यांमध्ये एड्स वेगाने वाढतो आहे. या रिपोर्टमुळे कैद्यांसोबतच अधिकाऱ्यांचीही झोप उडाली आहे.
उन्नाव कारागृहांमध्ये बंद कैदी एचआयव्ही पीडित असल्याचं समोर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला आहे. लखनौ येथील कारागृहात ४९ कैदी एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचं उघड झालं आहे. त्यासोबतच नैनी कारागृहातील २१ आणि गाझियाबाद जिल्हा कारागृहातील ४६ कैद्यांना एड्स असल्याची माहिती आहे. रिपोर्टनुसार, अलीगढ जिल्हा कारागृहात २४ आणि मुरादाबाद कारागृहात ३३ कैद्यांना एचआयव्ही एड्स असल्याचं आढळून आलं आहे.
केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्हा कारागृहांमधील एकूण ७८७३९ कैद्यांच्या रक्तांचे सॅंपल घेतले गेले होते. तपासणीनंतर त्यातील ४५९ कैद्यांना एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. यावर वरिष्ठ अधिकारी चंद्र प्रकाश यांनी सांगितले की, कारागृहात कैद्यांना एड्स होत नाही. जे कैदी इथे येतात, त्यांची मेडिकल टेस्ट केली जाते. या टेस्टमध्ये त्यांना काही आजार आढळला तर त्यावर उपचार केले जातात'.