रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी बिल भरलं नाही; हॉस्पिटलनं कार गहाण ठेऊन मृतदेह ताब्यात दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 08:42 AM2021-04-15T08:42:15+5:302021-04-15T08:43:40+5:30
या हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला कोविड असल्याच्या संशयावरून उपचारासाठी दाखल केले होते.
वलसाड – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीनं संपूर्ण जगासमोर संकट उभं केलं आहे. या संकटावेळी प्रत्येक जण एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे येत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला काही हॉस्पिटल स्वत:च्या फायद्यासाठी गोरगरिब रुग्णांना लुटण्याचे धंदे सुरू केलेत. रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्रचंड प्रमाणात बिल आकारणी केली जात आहे.
गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात असचं एक प्रकरण समोर आलं. याठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोप केलाय की, एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांना देण्यास नकार दिला. पहिलं हॉस्पिटलचं संपूर्ण बिल भरा त्यानंतरच मृतदेह ताब्यात देऊ अशी भूमिका हॉस्पिटलने घेतली. हे प्रकरण वापीच्या २१ सेंचुरी या प्रसिद्ध हॉस्पिटलचं आहे.
या हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला कोविड असल्याच्या संशयावरून उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान या रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाला. रुग्णाच्या मृत्यूनंतर हॉस्पिटल प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांना देण्यास नकार दिला. पहिलं रुग्णालयाचं बिल भरा त्यानंतर मृतदेह देऊ असं हॉस्पिटलने सांगितल्याचं नातेवाईक म्हणाले. परंतु पैसे उपलब्ध नसल्याने हॉस्पिटलने नातेवाईकांची कार गहाण ठेवली. त्यानंतर रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केला. या प्रकारानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात हॉस्पिटलविरोधात तक्रार केली.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत हॉस्पिटल प्रशासनाकडे जाब विचारला तेव्हा दबावात येऊन त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना कार पुन्हा परत केली. हॉस्पिटलचे एमडी डॉ. अक्षय नाडकर्णी म्हणाले की, रुग्णालयाकडून बिलाची रक्कम केली असतानाही त्यांनी बिल भरण्यास नकार दिला होता.