नव्या वर्षात खासगी ट्रेनचे जाळे विणले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 03:17 AM2020-01-01T03:17:32+5:302020-01-01T06:49:05+5:30
भारतीय रेल्वेचे खासगीकरण सुरू असून, देशभरातील वेगवेगळ्या मार्गावरील १५० एक्स्प्रेस खासगी तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत.
- कुलदीप घायवट
भारतीय रेल्वेचे खासगीकरण सुरू असून, देशभरातील वेगवेगळ्या मार्गावरील १५० एक्स्प्रेस खासगी तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत. मागील वर्षांत लखनऊ ते दिल्ली तेजस एक्स्प्रेस ही पहिली खासगी ट्रेन धावली, तर जानेवारी, २०२० मध्ये मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस ही दुसरी खासगी ट्रेन धावणार आहे.
व्या वर्षात मुंबई-अहमदाबाद, मुंबई-पुणे, मुंबई-लखनऊ, मुंबई-नागपूर, नागपूर-पुणे, पुणे-पटना, मुंबई-वाराणसी या मार्गांवर अनेक खासगी एक्स्प्रेस रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) यांच्या वतीने चालविण्यात येणार आहेत. या ट्रेनमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या एक्स्प्रेसचे तिकीट दर इतर एक्स्प्रेसपेक्षा जास्त असेल.
मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून पाच वेळा धावण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. सध्या राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून चार वेळा धावते. पश्चिम रेल्वे प्रशासन ‘पर्यावरणस्नेही’ स्थानकांची निर्मिती करण्यावर भर देत आहे. नव्या वर्षात एकूण ३६ स्थानकांवर स्थानकाच्या ३० टक्के जागेत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. नव्या वर्षात डेक्कन क्वीनला एलएचबी कोचमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील नेरळ-माथेरान मार्गिका खुली करण्यात येणार आहे.
दुहेरीकरण, विद्युतीकरणावर भर
नव्या वर्षात मध्य रेल्वेच्या नागपूर, पुणे, भुसावळ, सोलापूर या भागांतील रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण, दुहेरीकरण करण्यात येणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील एक्स्प्रेसचे रूपांतर एलएचबी कोचमध्ये केले जाणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाच्या काम हाती घेतले जाणार आहे.
भाडेवाढ : नव्या वर्षात प्रति किमी ५ पैसे ते ४० पैसे भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी भाडेवाढीचे संकेत दिले आहेत. एसी, स्लीपर, जनरल, लोकलचे मासिक पास याच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
१,२०० नवे रेल्वे पादचारी पूल
देशभरातील रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी ६ हजार ९६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात सिग्नल व इंटरलॉकिंग प्रणालीच्या सुधारणेसाठी १ हजार ७५० कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. या आर्थिक वर्षात १ हजार २०० नवीन रेल्वे पादचारी पूल बांधले जाणार आहेत. यासाठी ६ हजार ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.