खासगी विहिरींना उपसाबंदी नाही
By admin | Published: April 21, 2016 12:59 AM2016-04-21T00:59:16+5:302016-04-21T00:59:16+5:30
पाणीटंचाई प्रश्न : चंद्रकांतदादांची माहिती; ‘लोकमत’मधील वृत्ताची दखल
कोल्हापूर : खासगी विहिरी व कूपनलिकांना उपसाबंदी नाही, अशी माहिती पालकमंत्री चंद्र्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी दिली. खरीप पूर्वतयारी बैठकीत पाणीटंचाईचा विषय चर्चेला आला. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते. शासकीय विश्रामगृहात बैठक झाली.
खासगी विहिरी, कूपनलिका यांच्यावरील उपसाबंदी कशी अन्यायकारक आहे, यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये सोमवारी (दि. १८) ‘खासगी विहिरी, कूपनलिकांवरही आता उपसाबंदी’ या मथळ्याखाली प्रसिद्धी झाले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन मंत्री पाटील यांनी खुलासा केला.
स्वतंत्र फिडर नसल्यामुळे वीज वितरण कंपनी सरसकट थ्रीफेज वीजपुरवठा बंद करीत आहे. त्यामुळे खासगी विहिरी व कूपनलिका यांना उपसाबंदी करावी लागत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले. यावर मंत्री पाटील म्हणाले, वीज वितरण कंपनीची ही तांत्रिक अडचण आहे. चुकीचा संदेश जायला नको. खासगी विहिरी, कूपनलिका यांना उपसाबंदी नाही. जिल्ह्यात कोठेही टंचाईची परिस्थिती नाही. १५ जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे, अशी माहिती सर्व वृत्तपत्रांना कळवा. शेती पंपाच्या प्रलंबित वीज जोडण्या पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव तयार करून दिल्यास ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करून निधी मिळविता येईल. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्वरित प्रस्ताव तयार करून माझ्याकडे द्यावा.
वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता शंकर शिंदे म्हणाले, ७ हजार ९३४ कृषी वीज जोडण्या प्रलंबित आहेत. जोडणीसाठी मूलभूत सुविधा नाही, अशा ठिकाणचे हे प्रलंबित कनेक्शन आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करून त्वरित वीज जोडणी देण्यासाठी दहा कोटी निधीची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)