देशातील आणखी १३ विमानतळांचे खासगीकरण,अदानी समूह लवकरच 3 ताब्यात घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 05:58 AM2021-09-10T05:58:40+5:302021-09-10T05:59:36+5:30
विमानतळांच्या एकत्रीकरण जे अपेक्षित आहे ते याप्रमाणे : वाराणसी हे कुशीनगर आणि गयासोबत, अमृतसर हे कांगरासोबत, भुवनेश्वर हे तिरुपतीसोबत आणि रायपूर हे औरंगाबादसोबत. इंदौर विमानतळ जबलपूरसोबत आणि त्रिची हे हुबळीसोबत.
नवी दिल्ली : केंद्राने रोखीकरण योजनेची घोषणा केल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाने १३ विमानतळांच्या खासगीकरणाला गुरुवारी मंजुरी दिली. यातील सहा मोठे आणि सात लहान विमानतळांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. सहा मोठ्या विमानतळांमध्ये अमृतसर, भुवनेश्वर, इंदौर, रायपूर, त्रिची आणि वाराणसी यांचा समावेश आहे, तर सात लहान विमानतळांमध्ये हुबळी, तिरुपती, महाराष्ट्रातील औरंगाबाद, जबलपूर, कांगरा, कुशीनगर आणि गया यांचा समावेश आहे. सरकारला खासगी क्षेत्रात २०२४ पर्यंत ३,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
विमानतळांच्या एकत्रीकरण जे अपेक्षित आहे ते याप्रमाणे : वाराणसी हे कुशीनगर आणि गयासोबत, अमृतसर हे कांगरासोबत, भुवनेश्वर हे तिरुपतीसोबत आणि रायपूर हे औरंगाबादसोबत. इंदौर विमानतळ जबलपूरसोबत आणि त्रिची हे हुबळीसोबत. विमानतळ प्राधिकरण आता लिलावाचे दस्तऐवज तयार करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. जेणेकरून पुढीलवर्षीपर्यंत प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल. वाराणसी - कुशीनगर - गया या स्थळांना पर्यटनामुळे लिलावात महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता आहे. याशिवाय वाराणसी हेही मोठे शहर असल्याने साहजिकच त्याकडेही बोली लावणाऱ्यांचा अधिक कल असेल. लहान विमानतळ हे मोठ्या विमानतळांसोबत एकत्रीकरण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सार्वजनिक - खासगी भागीदारीमध्ये (पीपीपी) खासगी कंपनी विमानतळाचा विकास आणि विस्तार करेन. मात्र, याची मालकी सरकारकडेच राहील.
पीपीपी तत्त्वावर चालविल्या जात असलेल्या विमानतळात हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, मुंबई, कोची, अहमदाबाद, लखनौ आणि मंगळुरू यांचा समावेश आहे. अदानी समूह लवकरच जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम विमानतळ ताब्यात घेणार आहे. तसेच नवी मुंबई विमानतळाचीही उभारणी करणार आहे.