रेल्वेच्या खासगीकरणामुळे प्रवाशांचे होणार नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 05:22 AM2019-10-16T05:22:21+5:302019-10-16T05:22:35+5:30
१६, १९,२३ आॅक्टोबरला रेल्वे कामगारांचे देशव्यापी आंदोलन होणार
मुंबई : परळ कारखाना बंद करण्याचा घाट, रेल्वेचे सुरू असलेले खासगीकरण या विरोधात नॅशनल रेल्वे मजदूर युनियनकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
१६ आॅक्टोबर रोजी माटुंगा कारखाना, १९ आॅक्टोबर रोजी सानपाडा कारखाना आणि २३ आॅक्टोबर रोजी देशव्यापी आंदोलन होणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. रेल्वेच्या खासगीकरणाने सर्वाधिक नुकसान रेल्वे कामगारांपेक्षा रेल्वे प्रवाशांचे होणार आहे, असे युनियनद्वारे ‘लोकमत’ला सागितले.
रेल्वे प्रशासनाने परळ कारखाना बंद करून तेथे टर्मिनस बांधण्याचा घाट घातला आहे. यासह देशातील जादा महसूल देणाऱ्या गाड्याचे खासगीकरण करण्यात आले आहे. परिणामी, भविष्यात रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांना रेल्वेच्या अंधाधुंदी कारभाराला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे यांच्याविरोधात आवाज उठविण्यात येणार आहे.
१४ आॅक्टोबर रोजी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या वतीने परळ येथील वर्कशॉपमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाविरोधात घोषणा दिल्या. रेल्वे वाचविण्यासाठी कामगारांच्या परिवारासह २३ आॅक्टोबर रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
तिकिटांचे दर वाढतील
रेल्वेच्या खासगीकरणाने प्रवाशांना तिकिटांचे दर दुप्पट-तिपटीने वाढतील. नुकताच दिल्ली-लखनऊ मार्गावर सुरू केलेली पहिली खासगी तेजस एक्स्प्रेसचे भाडे १ हजार ५०० आणि २ हजार ४५० आहे. मात्र, याच मार्गावरून सुरू असलेल्या शताब्दी एक्स्प्रेसचे भाडे १ हजार १६५ आणि १ हजार ८५५ रुपये आहे. यात तेजस एक्स्प्रेस दोनच थांबे घेऊन ६.३० मिनिटांत पोहोचते, तर शताब्दी एक्स्प्रेस ५ थांबे घेऊन ६.३५ मिनिटात पोहोचते. त्यामुळे दुप्पट भाडे घेऊन प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे.
खासगीकरण झालेल्या एक्स्प्रेसमध्ये ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांना कोणताही सुविधा नाहीत. त्यामुळे खासगीकरणाने प्रवाशांचे मोठे नुकसान होणार आहे, अशी भूमिका नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच महामंत्री वेणू नायर यांनी मांडली.