तुमची जबाबदारी नाही का? विनेश फोगाट प्रकरणावरुन शिवसेनेची पीटी उषांवर बोचरी टीका...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 08:05 PM2024-08-12T20:05:29+5:302024-08-12T20:05:55+5:30
विनेश फोगाट प्रकरणात शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि अध्यक्ष पीटी उषा यांच्यावर निशाणा साधला.
Vinesh Phogat Case : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याबद्दल शिवसेनेने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) आणि संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, भारतीय ऑलिम्पिक संघटना या प्रकरणापासून दूर राहून खेळाडूंच्या हिताचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहे.
रविवारी पीटी उषा यांनी एक विधान केले होते, ज्यामध्ये त्यांनी स्पर्धेत वजन कमी करण्याची जबाबदारी खेळाडू आणि प्रशिक्षकावर असल्याचे म्हटले होते. त्यांनी आपल्या वक्तव्यात कोणाचेही नाव घेतले नाही, पण त्यांचा इशारा विनेश फोगटला असल्याचे मानले जात आहे.
On Vinesh Phogat's lonely fight for justice, Indian Olympic Association's shameful press release. Is GoI endorsing the statement coming from PT Usha? If not, will they ask her to step down? pic.twitter.com/6zMK5EP13c
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) August 12, 2024
'केंद्र सरकारने कोणतेही सहकार्य दिले नाही'
या विधानाबाबत चतुर्वेदी म्हणाल्या की, 'भारतीय ऑलिम्पिक संघटनेने विनेश फोगाट प्रकरणात हात झटकले आहेत. एखादा खेळाडू जेव्हा तुम्ही पदक जिंकतो, तेव्हा भारतीय ऑलिम्पिक संघटनेची स्तुती करायची आणि पराभूत झाल्यावर आयओए स्वतःहून बाजूला जाते. जपान किंवा चीनच्या खेळाडूंसोबत असेच काही घडले असते, तर त्या देशाच्या सरकारांनी त्यांना अशीच साथ सोडली असती का?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भारताची ६ पदकं केवळ एका पावलावर राहिली; पदकतालिकेत कितव्या क्रमांकावर?
पीटी उषांवर टीका करत प्रियंका म्हणाल्या की, 'विनेशच्या खटल्याचा निर्णय मंगळवारी येणार आहे, अशा वेळी पीटी उषा यांनी हे वक्तव्य करण्याची काय गरज होती. तुम्ही खेळाडूचे मनोबल तोडत आहात. भविष्यात खेळाडूंनी स्वतःचा सपोर्ट स्टाफ आणावा, असे संघटनेचे म्हणणे आहे का? आयओएची कोणतीही जबाबदारी नाही का? हे दुर्दैवी आहे. केंद्र सरकारनेही आपल्या बाजूने कोणतेही सहकार्य दिले नाही,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.