“भाजप दलितांच्या जमिनी मंदिराच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न करतंय”; प्रियांका गांधींचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 06:18 AM2021-12-24T06:18:09+5:302021-12-24T06:25:26+5:30
राममंदिर जमीन घोटाळा प्रकरणी प्रियांका गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला.
शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप ज्या प्रकारे मंदिर, मशिदीच्या मुद्द्यावर राज्यात ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहे आणि राम मंदिराच्या आडून काशी व मथुरेचा प्रचार करून मत विभागणी करू इच्छित आहे. त्याविरुद्ध काँग्रेसने आवाज उठविला आहे. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधत आरोप केला की, लोकांच्या धार्मिक श्रद्धेचा लाभ घेऊन भाजप नेते आणि राज्यातील अधिकारी दलितांच्या जमिनी मंदिराच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न करत आहेत.
पत्रकारांशी संवाद साधताना प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांना जबाबदार ठरवीत आरोप केला की, अगोदर निधीचा घोटाळा केला आणि आता जमीन हडपली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. मंदिर उभारणीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे त्यांच्याकडूनच याची चौकशी झाली पाहिजे. दोन कोटींची जमीन राम मंदिर न्यासकडून २६.५० कोटीत खरेदी झाल्याचे समोर आले होते आणि त्यावरून गदारोळ झाला होता.