महिलांनी संरक्षणाची अपेक्षा कोणाकडून करायची? प्रियंका गांधी यांचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 06:48 PM2024-08-16T18:48:57+5:302024-08-16T18:49:08+5:30
देशातल्या अत्याचारांच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करत या क्रौर्याने देशाला धक्का बसल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे
Priyanka Gandhi : पश्चिम बंगाल, बिहार, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला आहे, असे म्हणत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी सरकारवर हल्लाबोल केला. देशात आरोपींना राजकीय संरक्षण दिले जात असताना महिलांच्या सुरक्षेची काय अपेक्षा करता येईल, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला. प्रियंका गांधी वड्रा यांनी शुक्रवारी कोलकाता येथील महिला डॉक्टरची क्रूरता आणि हत्या आणि देशातील महिलांवरील अत्याचाराच्या इतर घटनांबाबत शुक्रवारी ट्विट करत रोष व्यक्त केला.
देशातल्या अत्याचारांच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करत या क्रौर्याने देशाला धक्का बसल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. अशा प्रकरणांमध्ये वारंवार आरोपींना राजकीय संरक्षण आणि गुन्हेगारांना जामीन किंवा पॅरोल देणे यामुळे महिलांचे मनोधैर्य खचते. रोज ८६ बलात्कार होत असल्याचे सरकारी आकडे दाखवतात तेव्हा महिलांनी संरक्षणाची अपेक्षा कोणाकडून करायची? असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला.
"कोलकाता, बिहार, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचाराने संपूर्ण देश हादरला आहे. यावेळी देशभरातील महिला दु:खी आणि संतप्त आहेत. जेव्हा-जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा देशातील महिला बघतात की सरकारे काय करत आहेत? त्यांचे शब्द आणि उपाय किती गंभीर आहेत? ज्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस संदेश देण्याची गरज होती, त्याठिकाणी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलांवरील घृणास्पद अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये उदारता दाखवणे, आरोपींना राजकीय संरक्षण देणे आणि शिक्षा झालेल्या कैद्यांना जामीन/पॅरोल देणे यासारख्या वारंवार केल्या जाणाऱ्या कृतींमुळे महिलांना निराश केलं जात आहे. यातून देशातील महिलांना काय संदेश जातो? सरकारी आकडेवारीत रोज ८६ बलात्कार होत असताना महिलांनी संरक्षणाची अपेक्षा कोणाकडून करायची?," असे प्रियंका गांधी यांनी म्हटलं.
गेल्या काही दिवसांत महिला अत्याचारांवर घडलेल्या घटनांचा प्रियंका गांधी यांनी उल्लेख केला आहे. ९ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर भीषण बलात्कार आणि हत्या करण्यात आली होती. तर उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये एका खाजगी रुग्णालयातील नर्सवर बलात्कार करून तिचा चेहरा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एका १४ वर्षीय मुलीचे तिच्या घरातून अपहरण करण्यात आले आणि तिचा मृतदेह तलावात सापडला होता.