मंदीमुळे आर्थिक उत्पन्न शून्यावर, तरीही मौन बाळगून आहेत पंतप्रधान - प्रियंका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 11:54 AM2019-12-13T11:54:42+5:302019-12-13T12:12:23+5:30
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर मौन बाळगून आहेत'
नवी दिल्ली : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून निशाणा साधला आहे. तर प्रियंका गांधी यांनी देशातील आर्थिक मंदी आणि महागाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे.
प्रियंका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. गेल्या तीन वर्षांत महागाईने उच्चांग गाठला आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक लागणाऱ्या वस्तू घेताना सर्व सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे. देशातील आर्थिक मंदीमुळे उत्पन्न शून्यावर आले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर मौन बाळगून आहेत, अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे.
याशिवाय, प्रियंका गांधी यांनी आणखी एक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सामान्य लोकांच्या समस्यांपासून इतक्या लांब असलेले पंतप्रधान असतील, असे कदाचित भारताच्या इतिहासात घडले असेल, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दुसरीकडे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणाऱ्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला ईशान्येकडील राज्यांत जोरदार विरोध होत आहे. यावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.