उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून प्रियांका गांधी मैदानात उतरण्याची शक्यता
By Admin | Published: July 5, 2016 10:56 AM2016-07-05T10:56:40+5:302016-07-05T10:56:40+5:30
उत्तर प्रदेशात काँग्रेसला उभारी देण्यासाठी विधानसभा निवडणुकीत स्टार कॅम्पेनर म्हणून प्रियांका गांधी मैदानात उतरण्याची शक्यता आहे
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 05 - उत्तर प्रदेशात काँग्रेसला उभारी देण्यासाठी विधानसभा निवडणुकीत स्टार कॅम्पेनर म्हणून प्रियांका गांधी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. प्रियांका गांधींसमोर ठेवण्यात आलेला प्रस्ताव मान्य करणार असल्याची माहिती मिळत आहे. तसं झाल्यास उत्तर प्रदेशात पक्षाची असलेली बिकट परिस्थिती सुधारण्यास मदत होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आतापर्यंत फक्त रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघात प्रचार करणा-या प्रियांका गांधींनी आपली भुमिका वाढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. प्रियांका गांधींनी याअगोदर फक्त आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांच्यासाठीच प्रचार केला आहे. उत्तर प्रदेशची जबाबदारी हाती दिेलेल्या गुलाम नबी आझाद यांची प्रियांका गांधींनी काही दिवसांपुर्वी भेट घेतली होती. यावरुन प्रियांका गांधी फक्त रायबरेली आणि अमेठीपुरतं मर्यादित न राहता इतर ठिकाणीही प्रचार करु इच्छित असल्याचे संकेत मिळत आहेत.
विशेष म्हणजे प्रियांका गांधींना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून प्रोजक्ट करावे असे मत स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं होतं. यावर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यामध्ये दोन वेळा चर्चा झाली आहे. या चर्चेत गुलाम नबी आझाद आणि प्रशांत किशोरदेखील सहभागी झाले होते. राहुल गांधी 20 जूनला सुट्टीवर गेल्यानंतर सोनिया आणि प्रियांका गांधींनी पुन्हा एकदा गुलाम नबी आझाद आणि प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केली होती.
प्रियांका गांधी यांनी 25 जूनला गुलाम नबी आझाद यांची भेट घेत या विषयावर चर्चा केली होती. यावरुन प्रियांका गांधी उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी मैदानात उतरत असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण गांधी कुटुंबातील कोणताही सदस्य अशाप्रकारे स्वत: जाऊन पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेत नाहीत.
उत्तर प्रदेशमधली काँग्रेसची परिस्थिती बिकट असून ती सुधारायची असेल तर राहूल किंवा प्रियांका गांधींना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून प्रोजक्ट करावे असं मत स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं होतं. किशोर यांच्या प्रस्तावाप्रमाणे राहूल अथवा प्रियांका यांनी मुख्यमंत्रीपदासाठी नकार दिला तर अन्य उमेदवार ब्राह्मण असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात काँग्रेसला पुन्हा महत्त्वाचं स्थान मिळावं यासाठी दोरणात्मक आखणी करण्यासाठी प्रशांत किशोर यांची नियुक्ती करण्यात आली. आणि असे समजते की, किशोर यांच्या मतानुसार पक्षाची धुरा ब्राह्मण व्यक्तिकडे देण्याची गरज आहे. नरेंद्र मोदींची 2014 ची लोकसभा निवडणूक आणि नितिश कुमार यांची बिहार निवडणूक यशस्वीरीत्या हाताळलेल्या किशोर यांच्याकडे काँग्रेस धोरण निश्चित करण्यासाठी आशेने बघत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या 10 ते 12 टक्के असून हा समाज भाजपाकडे वळला आहे, आणि त्याला आकृष्ट करण्याचा प्रयत्न करावा अशी किशोर यांची व्यूहरचना दिसत आहे. चांगल्या पर्सनॅलिटिजना समोर आणण्याचा किशोर यांचा प्रयत्न असून गेल्या काही वर्षांमधले काँग्रेसचे लोकप्रिय नेते आणि जुने राजकारणी, मंत्री कदाचित पुढेआणले जातील आणि त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांची फळी उभारण्यात येईल अशी शक्यता आहे.
मुलायम सिंग यादव आणि मायावती या नेत्यांचा करीश्मा उत्तर प्रदेशमध्ये असून त्यांच्या मतदारांचा आधार जवळपास निश्चित आहे, जो भेदणे काँग्रेसला कठीण आहे. तर जवळपास तीन दशके उत्तर प्रदेशमधल्या सत्ताकेंद्रापासून बाहेर फेकले गेलेल्या काँग्रेसला हक्काचा मतदार नाही, ही मोठ समस्या आज पक्षापुढे आहे.